राज्यात ११ हजार ३३० पदवीधर बेरोजगार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

रोजगार विनिमय केंद्रामध्ये नोंदणी असलेल्या शिक्षित बेरोजगार असलेल्यांची संख्या ४७ हजार ६२९ आहे. त्यामध्ये ११ हजार ३३० पदवीधर व ३४९५ हे पदव्युत्तर आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास त्यात सुधारणा होण्याची शक्यता धुसर आहे. 

पणजी: कोविड महामारीमुळे राज्यातील उद्योग व व्यावसायिकांचा आर्थिक कणा मोडला आहे. अनेकजणांना रोजगार गमावावा लागला आहे. अशा परिस्थितीत रोजगार विनिमय केंद्रामध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. या केंद्रामध्ये नोंदणी असलेल्या शिक्षित बेरोजगार असलेल्यांची संख्या ४७ हजार ६२९ आहे. त्यामध्ये ११ हजार ३३० पदवीधर व ३४९५ हे पदव्युत्तर आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास त्यात सुधारणा होण्याची शक्यता धुसर आहे. 

पदवी, बारावी पास उमेदवारांची नोंदणी सर्वाधिक
रोजगार विनिमय केंद्रात नोंद असलेल्या माहितीनुसार नोंदणी झालेल्यांमध्ये पदवी व बारावी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची संख्या अधिक आहे. दहावी उत्तीर्ण झालेले ५ हजार २५०, बारावी उत्तीर्ण झालेले ११ हजार २०१, प्रमाणपत्र किंवा इतर अभ्यासक्रम केलेले ९ हजार २८७, दहावी नंतर पदविधारक ५१०, बारावीनंतर पदविकाधारक १ हजार १६४, पदवीधारक ११ हजार ३३०, आयटीआय ३,०१९, पीएचडी केलेले २६, पदव्युत्तर ३,४९५, सहावीपर्यंत शिक्षण घेतलेले ३०४, नववीपर्यंत शिक्षण घेतलेले १९८३ आहेत. हल्लीच सरकारनेही येत्या डिसेंबरमध्ये सरकारी खात्यातील नोकरभरती स्थगित ठेवल्याने नोंदणी असलेल्यांची संख्या ‘जैसे थे’ आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

बार्देशमध्‍ये बेरोजगार सर्वाधिक
नोंदणी केलेल्‍यांची संख्या दरवर्षी विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर वाढत आहे. यावर्षी कोविड महामारीमुळे नोंदणी प्रक्रिया थंडावली आहे. २०१८ पासून आतापर्यंत सरकारी खात्यात १४१८ जणांना केंद्रात नोंदणी असलेल्यांना रोजगार मिळाला आहे. राज्यात तालुकावार सर्वाधिक बेरोजगार बार्देश तालुक्यात (७६६२) तर त्याच्यापाठोपाठ फोंडा (७१२२) तालुक्याचा क्रमांक लागतो. पाच हजारांपेक्षा अधिक बेरोजगार असलेल्यांमध्ये डिचोली, सालसेत, सत्तरी व तिसवाडी तालुके आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.  

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या