पणजी, : पोलिस खात्याच्या वाहतूक पोलिस विभागातर्फे ट्राफिक सेंटीनेल (वाहतूक पहारेकरी) योजनेमुळे वाहनचालक नियमांचे पालन करू लागले. मात्र, या योजनेत सहभागी होऊन नोंदणी असलेल्या सेंटीनेलना वेळेवर मानधन मिळणे कठीण होत आहे. गेल्यावर्षीचे मानधन यावर्षी मंजूर झाले आहे. सुमारे साडेचारशे सेंटीनेल्सच्या खात्यावर ही १.२० कोटींची रक्कम जमा केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी एका ट्राफिक सेंटीनेलने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. ट्राफिक सेंटीनेल योजनेखालील प्रत्येक सदस्याला त्याने वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केलेल्याची छायाचित्रे पाठविल्यावर गुण जमा केले जातात. शंभर गुण झाल्यावर त्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये दिले जातात. ही योजना २०१७ पासून सुरू आहे. सुरुवातीला या योजनेखाली सेंटीनेलना वेळेवर रक्कम दिली जात होती. त्यामुळे या योजनेकडे अनेकजण आकर्षित झाले. सध्या या योजनेखाली सुमारे आठ हजाराहून अधिकजण नोंदणी झालेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून सेंटीनेलना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. सरकार ही रक्कम मंजूर करत नाही, तोपर्यंत तिचे वितरण करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जी १.२० कोटींची रक्कम सरकारने मंजूर केली आहे, ती गेल्या वर्षात सेंटीनेलने पाठविलेल्या छायाचित्रांनुसार मिळालेल्या गुणांची आहे. ही रक्कम सुमारे साडेचारशे सेंटीनेलना वाटप केली जाणार आहे. यावर्षीची ही रक्कम अजून सरकारकडे पाठविण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी दुचाकी चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना तत्कालीन पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सुरू केली होती. लोकांना या योजनेत सहभागी करून दुचाकींना हेल्मेट सक्ती तसेच इतर नियमांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. त्यामुळे दरदिवशी नियमांचे उल्लंघन केलेली किमान २०० छायाचित्रे पोलिस वाहतूक विभागाकडे येत असतात. त्याची वर्गवारी करून संबंधित पाठविणाऱ्या सेंटीनेलला गुण दिले जातात. त्यांचे गुण १०० झाल्यावर त्याला एक हजार रुपये लागू होतात. ही योजना फायदेशीर असल्याने अनेक तरुण त्यामध्ये सहभागी झाले आहेत.
|