एकाच दिवसात १३६ रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक

dainik gomantak
गुरुवार, 9 जुलै 2020

 

डॉक्टर आणि तंत्रज्ञांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कर्मचारी नेमणूक प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण करून पुढील आठवड्यात ही थेरपी उपचार सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
 

पणजी,

राज्यात प्लाझ्मा थेरपी उपचार पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. कोविड इस्पितळात अतिदक्षता विभागात वेंटीलेटर्सवर असलेल्या रुग्णांवर हा उपचार केला जाणार आहे. या उपचारांसाठी लागणाऱ्या ‘अफेरोसिस’ मशीनची ऑर्डर देण्यात आली असून येत्या तीन दिवसात हे मशीन उपलब्ध होणार आहे. राज्यात आज कोरोना बाधितांची संख्या १३६ वर पोचल्याने एक वेगळा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २ हजारांवर गेली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार राज्यभरात वेगाने वाढू लागल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ५१ रुग्ण बरे झाले असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ८२४ वर पोहचली आहे. दरम्यान, आजच्या दिवसात करमळी, कांदोळी, बाणवली यासारख्या ठिकाणी कोरोना रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजवरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०३९ झाली असून यातील १२०७ रुग्ण बरे झाले आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आरोग्य खात्यातील इतर अधिकाऱ्यांसोबत प्लाझ्मा थेरपीबाबतीत आज बैठक घेतली. जे रुग्ण कोरोना बाधित आजारातून मुक्त झाले आहेत, त्यांना दोन आठवड्यांनंतर बोलावून घेतले जाईल आणि त्यांची इच्छा असेल, तरच त्यांचा प्लाझ्मा घेतला जाईल. अशा प्रकारचे दोन हजार प्लाझ्मा पॅक फ्रीझरमध्ये ठेवण्याची क्षमता आहे. त्याचा वापर रुग्णांना भविष्यात उपचारासाठी वापरले जाणार आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी आवश्‍यक असलेल्या विशेष डॉक्टर आणि तंत्रज्ञांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कर्मचारी नेमणूक प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण करून पुढील आठवड्यात ही थेरपी उपचार सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

कोरोनामुळे हादरले लोक
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर येथील कर्मचारी वर्ग घाबरले आहेत. कारागृह प्रशासनाने या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यासाठीची मागणी केली आहे. वेर्णा येथील कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या सासूबाईनाही कोरोना झाल्याचे समोर आले असून याबद्दल संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांना विलगीकरण करण्यात आले आहे. कांदोळी इस्पितळात काम करणाऱ्या एका रुग्ण मदतनीसला कोरोना झाल्याने हे इस्पितळ बंद करण्यात आले आहे. या इस्पितळातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या