भंडारी समाजाच्या माजी समितीकडून गैरव्यवहार

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

गोमंतक भंडारी समाजाची अधिकृत कार्यकारी समिती कार्यरत असताना माजी अध्यक्ष अनिल होबळे हे स्वतः अध्यक्ष असल्याचे सांगून समाजाची दिशाभूल करत आहेत.

 पणजी : गोमंतक भंडारी समाजाची अधिकृत कार्यकारी समिती कार्यरत असताना माजी अध्यक्ष अनिल होबळे हे स्वतः अध्यक्ष असल्याचे सांगून समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या काळात झालेल्या खर्चाच्या व्यवहारांचा हिशोब सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे माजी अध्यक्ष अनिल होबळे यांच्यासह माजी सरचिटणीस व आजी मुख्य कार्यवाह उपेंद्र गावकर तसेच माजी खजिनदार शिवदास माडकर या तिघांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समाजाच्या कार्यालयातून जातीच्या दाखल्यासंदर्भातची १४ पावत्या वह्या गायब आहेत. या दाखल्यांसदर्भातचा हिशोब देण्यासाठी माजी समितीचे अध्यक्ष अनिल होबळे व माजी सरचिटणीस उपेंद्र गावकर यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दोन वर्षे उलटून गेली तरी अजूनही हिशोब सादर केलेला नाही. समाजातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून तक्रार देण्यात आली नव्हती व हिशोब दिला जाईल असे गृहित धरण्यात आले होते. मात्र समाजाच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ही तक्रार देण्यात येणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. 
पणजीतील समाजाच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष देवानंद नाईक, सहखजिनदार सुनील नाईक हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले की, अनिल होबळे हे अध्यक्ष नसताना त्यांना समाजाच्या समितीच्यावतीने बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. विद्यमान कार्यकारी समितीने राज्यात ग्राम, तालुका, युवा तसेच महिला समित्या स्थापन करून व्यवस्थितपणे समाजाचे कार्य सुरू आहे. सदस्यनोंदणी शुल्क ५०० रुपयांवरून १०० करण्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही.

संबंधित बातम्या