‘मोप’विमानतळाचे काम सुसाट!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

पेडणे तालुक्यातील मोप येथे आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ प्रकल्पाच्या कामाने सध्या गती घेतली असून सध्या प्रकल्पाचे १७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा विमानतळ प्रकल्प पूर्ण झालेला असेल.

पणजी : पेडणे तालुक्यातील मोप येथे आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ प्रकल्पाच्या कामाने सध्या गती घेतली असून सध्या प्रकल्पाचे १७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा विमानतळ प्रकल्प पूर्ण झालेला असेल. मोप येथे एकाचवेळी धावपट्टी, हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, प्रशासकीय इमारत, तांत्रिक इमारत, मुख्य पाणी साठवण टाकी, प्रशासकीय इमारत आणि कुंपणाचे काम सुरू आहे. तीन पाळ्यांत बाराशे हजार जणांचे हात या प्रकल्पावर राबत असून आणखी काही दिवसांनी आणखी पाचशेजण या कामावर रुजू होणार आहेत.

राज्य सरकारचे हवाई वाहतूक संचालक सुरेश शानभोग यांनी ही माहिती ‘गोमन्तक’ला दिली. ते म्हणाले, प्रकल्पाचे काम सुरळीतपणे सुरू आहे. विमानतळ परिसर म्हणजे सपाट जमीन. ती करण्यासाठी 
१ कोटी घनमीटर माती काढावी लागेल आणि तेवढीच माती दुसरीकडे घालावी लागेल. माती काढण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. भराव घालण्याचे काम ६ ते ७ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पावर आजवर पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावर भू संपादन व तत्संबंधी खर्चाच्या आकड्याचा समावेश नाही. केवळ बांधकामावर पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकाचवेळी प्रकल्पाच्या विविध घटकांची कामे सुरू असल्याने विमानतळाचे काम वेगाने मार्गी लागले आहे.

प्रकल्‍प रेंगाळण्‍याचा प्रश्‍‍नच नाही!
कोविड काळात काम थोडे मागे पडले, नंतर पाऊस आला तरी आता कामाने गती घेतल्याचे सांगून ते म्हणाले, रात्रीच्यावेळी केवळ इमारतींच्या आतील काम केले जाते. इतर दोन पाळ्यांत सर्वच ठिकाणी काम चालते. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प देखरेख समिती आहे. ती दर पंधरवड्याला किंवा महिन्याने प्रकल्पाचा आढावा घेते. त्यामुळे एरव्ही सरकारी दप्तरदिरंगाईचा फटका इतर प्रकल्पांना बसू शकणारा फटका या प्रकल्पाला बसत नाही. कोणत्याही खात्याकडून या प्रकल्पाला परवानगी हवी असेल, तर मुख्य सचिवांकडून कालमर्यादा ठरवून दिली जाते आणि परवानगी मिळाली की नाही याची विचारणाही मुख्य सचिवांकडून केली जाते. त्यामुळे प्रकल्प रेंगाळण्याचा प्रश्नच येत नाही.

कौशल्‍य विकासकेंद्र ऑगस्‍टमध्‍ये कार्यान्‍वित
विमानतळावर स्थानिकांना रोजगार देण्‍यासाठी विमानतळ कौशल्य विकास केंद्र पुढील वर्षी ऑगस्टमध्ये कार्यान्वित केले जाणार आहे. बॅग स्क्रीनर व एअरपोर्ट फायर फायटर हे दोन अभ्यासक्रम राज्याबाहेर शिकवले जातील. त्यासाठी अर्ज मागवून उमेदवारांना नोकरीवर घेतले जाईल आणि नंतरच प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. या अभ्यासक्रमाचा खर्च त्या उमेदवाराला करावा लागणार आहे. नोकरीची हमी असल्याने त्याने तो करावा, अशी अपेक्षा आहे. इतर सर्व पदांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पाच मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे निर्मिती
विमानतळाला लागणारी ५ मेगावॅट वीज ही सौर उर्जा प्रकारातून तयार केली जाणार आहे, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले की, प्रकल्पस्थळी कापण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात पाच वर्षात पाच लाख ५० हजार रोपटी लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. गोवा राज्य जैव विविधता मंडळाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्या मंडळाचे सदस्य सचिव प्रदीर सरमुकादम यांनी आताच दोन लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षात म्हटले असले, तरी आम्ही चार वर्षातच पाच लाख ५० हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य गाठणार आहोत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर यांचेही हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात मोलाचे सहकार्य मिळाले आहे.

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाने गोव्याच्या प्रगतीची दारे खुली होतील. मोप विमानतळामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. त्याशिवाय औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. गोव्याच्या विकासात या प्रकल्पात यापुढे वाटा असेल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

ऑगस्ट २०२२ पर्यंत विमानतळ कार्यान्वित! 
विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर सहा महिने त्यावर चाचण्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच विमानोड्डाणाचे परवाने मिळतात, असे सांगून ते म्हणाले, ऑगस्ट २०२२ मध्ये मोप विमानतळ कार्यान्वित होईल, असे लक्ष्य सध्या आहे. त्याच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान कार्यालयातूनही वेळोवेळी घेण्यात येत आहे. कंत्राटदाराने काम उशिराने केले तर त्याला दंडाची आणि सरकारने परवाने वेळेत दिले नाहीत तर सरकराला दंडाची तरतूद या प्रकल्पाच्या करारात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून उशीर होत नाही. त्याचा फायदा प्रकल्प वेळेवर वा वेळेपूर्वीच होण्याने होणार आहे.
 

संबंधित बातम्या