मडगावात दोन दिवसांत १७१ पॉझिटिव्ह!

वार्ताहर
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

मडगावात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून या दोन दिवसांत मडगाव पालिका क्षेत्रात १७१ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

नावेली: मडगावात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून या दोन दिवसांत मडगाव पालिका क्षेत्रात १७१ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मडगावमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६८० च्या वर गेली आहे. 

गेल्या काही  दिवसांपासून मडगावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ४०-५० अशी होती.  मात्र, बुधवारी यात दुप्पट वाढ झाली. बुधवारी एकाच दिवशी मडगाव पालिका क्षेत्रात ११३, तर गुरुवारी ५८ रुग्ण आढळले. 

मडगावकरांसाठी धोक्याची सूचना असल्याची चर्चा सुरू आहे. बुधवारी मडगावात ९५, तर फातोर्डा भागात १८ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी मडगावात ३० व फातोर्ड्यात २८ रुग्ण आढळले. सासष्टीत आज एकूण १३० रुग्ण आढळले,  अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले आहे. मास्क घालून सुरक्षीत अंतर नियमाचे पालन केले व पुनःपुन्हा हात सॅनिटाईज केले किंवा धुतले, तर कोरोनाचा फैलाव रोखता येऊ शकतो. यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. दुसऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. प्रतिबंधक उपाययोजना प्रत्येकाने करायला हवी, असे कामत यांनी सांगितले. 

मडगावच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये मडगाव व परिसरातील नागरिकही चाचणी करवून घेतात. त्यामुळेही मडगावातील रुग्णसंख्येत वाढ दिसून येते, असे कामत यांनी सांगितले. 

मडगावातील उद्योजक विवेक नाईक यांच्या मते मडगावात कुठेही सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याचे दृष्टीस पडत नाही. यावरून संबंधित प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. जर ही स्थिती अशीच राहिल्यास  परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 
 

संबंधित बातम्या