तिसवाडीतील २० गुन्हेगार तडिपारांच्या यादीत

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

दोघांची रासुकासाठी शिफारस, अनेकांवर चॅप्टर प्रकरणे नोंद

पणजी: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेऊन पोलिस खात्याने १०२ गुन्हेगारांना तडिपार करण्यासाठी शिफारस १०२ गुन्हेगारांची शिफारस केली आहे. त्यामध्ये तिसवाडी तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिकजणांचा समावेश आहे. दोन गुन्हेगारांची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सुमारे दोन डझनपेक्षा अधिकांविरुद्ध चॅप्टर प्रकरणे नोंद करून फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. सांताक्रुझ टोळीयुद्धनंतर या भागात गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण आले आहे. 

सांताक्रुझ मतरादरसंघातील चिंबल, मेरशी, सांताक्रुझ तसेच कालापूर हे परिसर गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांच्या नकाशावर यापूर्वीच आहेत. त्यामुळे सांताक्रुझ येथील टोळीयुद्ध प्रकरणानंतर या गुन्हेगारांना व गुन्हेगारांच्या टोळीमध्ये सामील होणाऱ्या बेरोजगार तरुणांना वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी चॅप्टर केसीस तयार करण्यात आल्या आहेत. जेनेटो कार्दोझ हा अनेक गुन्ह्यांमध्ये असल्याने त्याच्या तडिपारसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच अर्ज दाखल झालेला आहे. तिसवाडी तालुक्यातील दोघांचा रासुकासाठी शिफारस करण्यात आली आहे त्यामध्ये मार्सेलिनो व रोनी यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्या गुन्हेगारांविरुद्ध न्यायालयात हल्ला प्रकरण, खंडणीवसुली, धमकी, गुन्हेगारी टोळीमध्ये सामील असलेले अशांची नावे पोलिसांनी सांताक्रुझ टोळीयुद्धनंतर त्यांचा शोध सुरू केला होता. तिसवाडी तालुक्यातील पणजी, जुने गोवे तसेच आगशी पोलिस स्थानकात ज्यांच्यावर वरील गुन्हे नोंद आहेत त्याच्या फाईल्समधून माहिती काढून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या उदयोन्मुख तरुण गुन्हेगारांना पोलिसांचा वचक बसेल व त्यांना तडिपार केल्यावर ते राहत असलेल्या भागात प्रवेश करता येणार नाही. सांताक्रुझ या भागात अट्टल गुन्हेगार जेनेटो कार्दोज याचे वर्चस्व असून त्याची टोळी आहे. 

राज्यातील सांताक्रुझ मतदारसंघ गुन्हेगारीसाठी गेल्या अनेक दशकापासून चर्चेत आहे. चिंबल व मेरशी या परिसरात झोपडवस्ती आहे त्यामुळे परप्रांतीय गुन्हेगारांना येथे आश्रय घेण्यासाठी सोपे जात आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये अधिक परप्रांतीय कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहत आहे. बेरोजगार होतकरू तरुण गुन्हेगारीकडे वळत आहे. त्यामुळे सांताक्रुझ टोळीयुद्धनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेतून जामिनावर असलेल्या जेनेटो कार्दोज याच्यासह इतर संशयितांना पंधरवड्याने बोलावून सक्त ताकीद दिली जात आहे. ज्यांच्या नावांचा तडिपारसाठी शिफारस करण्यात आली आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. काहींचा पत्ता घेण्यात आला असून अधुनमधून त्यांची पोलिसांमार्फत तपासणी केली जात आहे. त्यामुळे सांताक्रुझ परिसरातील गुन्हेगारी दहशत कमी झाली आहे. जेनेटो कार्दोज याच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण आले आहे. 

पणजी व आगशी या भागात गुन्हेगारी कारवायांचे प्रमाण कमी झाले असले तरी सांताक्रुझमधील काही गुन्हेगारांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांकडून ‘प्रोटेक्श मनी’च्या नावाखाली खंडणीवसुली सुरू केली होती मात्र त्यांच्या या कारवायांवरही लक्ष ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या