स्टार्टअपद्वारे २० गोमंतकीय तरुणांना रोजगार

यशवंत पाटील
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

व्हडलेभाट - ताळगाव येथील विरेश वझिरानी यांनी चंग बांधला आणि स्टार्टअपद्वारे ऑनलाईन मार्केटींग सुरू करून त्यांची समस्या सोडविली. स्टार्टअपद्वारे ‘ग्रोथ ग्रेवी’ या ऑनलाईन मार्केटींग कंपनीची स्थापना करून त्यांनी २० सुशिक्षीत गोमंतकीय तरुणांना रोजगारही मिळवून दिला.

पणजी- निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना, मंदिरे, चर्च, तसेच विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक दरवर्षी भेट देतात. त्यांना सुरक्षितरीत्या राज्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळता यावे आणि राज्याच्या विविध भागात त्यांचा प्रवास सुखकर व्हाया या उद्देशाने ‘रेंट अ बाईक’, ‘रेंट अ कार’ व्यावसायिक तयार झाले. यासाठी काही ‘रेंट अ कार’ व्यावसायिकांनी या व्यवसायासाठी बँकांची कर्जे काढून चारचाकी गाड्या घेतल्या, पण ग्राहक मिळणार कसे ही समस्या त्यांच्यासमोर होती. ही समस्या सोडविण्यासाठी व्हडलेभाट - ताळगाव येथील विरेश वझिरानी यांनी चंग बांधला आणि स्टार्टअपद्वारे ऑनलाईन मार्केटींग सुरू करून त्यांची समस्या सोडविली. स्टार्टअपद्वारे ‘ग्रोथ ग्रेवी’ या ऑनलाईन मार्केटींग कंपनीची स्थापना करून त्यांनी २० सुशिक्षीत गोमंतकीय तरुणांना रोजगारही मिळवून दिला.

विरेश वझिरांनी यांनी पणजी येथील मुष्टीफंड हायस्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर फर्मागुढी येथील ‘एनआयटी गोवा’ अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग’ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर अनेक कंपन्यांतून त्यांना रोजगाराच्या संधी आल्या, पण त्यांनी आपण व्यवसायच करणार हे मनाशी पक्के केले. इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान ‘इन्वेंट्रम’ (रोबोटिक्स) या स्टार्टअप कंपनीत तसेच ‘डिपर’ या कंपनीत इंटर्नशीप केल्याचा फायदा त्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी झाला.

आपल्या मित्राचे वडील जोईश हे ‘रेंट अ कार’ व्यावसायिक आहेत. त्यांनी एक दिवस माझ्याकडे समस्या मांडली, की ‘आपल्याकडे ५० हून अधिक टॅक्सी आहेत, पण कस्टमर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे मला कस्टमर मिळतील अशी काही तरी आयडिया दे.’ जोईश यांच्यासारखे अनेक व्यावसायिक राज्यात आहेत, परंतु ग्राहक मिळणं ही त्यांची मोठी समस्या आहे. याची जाणीव मला झाली आणि त्यादृष्टीने मी माझे प्रयत्न सुरू केले. घरातच बसून केवळ एका लॅपटॉपच्या भांडवलावर ‘रेंट अ कार’ व्यावसायिकांची समस्या सोडविण्याच्या भावनेतून मी माझा व्यवसाय सुरू केला. यासाठी ‘जोईश कार रेंटल’ ही वेबसाईट तयार केली. ती जगभरातील गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लाभदायी ठरली. या वेबसाईटवरून ते टॅक्सी बुक करू लागले आणि जोईश यांची कस्टमर मिळत नाहीत ही समस्या दूर झाली. ना नफा ना तोटा तत्त्वावर त्यांना मी ही वेबसाईट केवळ ३० हजार रुपयांत तयार करून दिली. माझ्या या व्यवसायाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी २०१६ साली ‘ग्रोथ ग्रेवी’ नावाची कंपनी स्थापन केली, असे विरेश वझिरानी यांनी सांगितले.

‘जोईश कार रेंटल’ यांच्या वेबसाईटनंतर आम्ही अनेक आस्थापनांसाठी सुमारे ४० वेबसाईट तयार करून ऑनलाईन मार्केटद्वारे ग्राहक मिळवून देऊन त्यांच्या व्यवसाय वृद्धीस हातभार लावला. अल्कॉन, रिअल इस्टेट, भरणे क्रिएशन्स, हुंडाई, हिमालया हर्बल, फोर्ड, मर्सिडीज यासारख्या ४० आस्थापनांसाठी आम्ही काम केले. त्यात अमेरिका, स्वित्झर्लंड, दुबई येथीलही काही कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

खरे तर माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला नोकरी करण्याचा सल्ला माझे वडील अमर वझिरानी आणि आई कोमल वझिरानी यांनी दिला, परंतु मला व्यवसाय सुरू करायचा होता. मी त्यांच्याकडे माझे व्यवसायात करिअर करण्यासाठी दोन वर्षांची मुदत मागितली. व्यवसायात जर यशस्वी झालो नाही, तर मी नोकरी करू असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी मला संधी दिली आणि मी व्यवसायात यशस्वी झालो. ही दोन वर्षांची मला घरातून संधी मिळाली नसती, तर मी माझे करिअर घडवू शकलो नसतो. त्यामुळे माझ्या यशस्वी वाटचालीचे सर्व श्रेय मी माझ्या आई - वडिलांना देतो, असे विरेश यांनी अभिमानाने सांगितले.

...आणि पर्रीकरांनी केले कौतुक
माहिती तंत्रज्ञान संचालनालयात कंपनीची मी नोंदणी केली. त्यानंतर गोव्यात दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन वेबसाईट तयार करण्यासाठीची निविदा जाहीर झाली. त्यानुसार ही निविदा भरली आणि मला कंत्राट मिळाले. हा माझ्या आयुष्यातील मोठा प्रोजेक्ट होता. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप महेनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधी नोंदणी तसेच इतर माहितीसह इफ्फीसाठी चांगली वेबसाईट तयार केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे ईएसजीचे चेअरमन व अमेय अभ्यंकर हे सीईओ होते. त्यांना ही वेबसाईट खूप आवडली. पर्रीकर साहेबांनी तर माझे खूप कौतुक केले आणि ‘असेच काम करत रहा, जीवनात यशस्वी होशील’ असा आशीर्वादही दिला, असे विरेश वझिरानी यांनी भाऊक होऊन सांगितले. सुरवातील इफ्फीचे हे कंत्राट मला तीन वर्षांसाठी मिळाले होते. त्यानंतर आणखी एक वर्ष वाढवून मिळाले, अशीही माहिती त्यांनी दिली.

आणखी ४० जणांना रोजगार देण्याचे ध्येय

केवळ एक लॅपटॉप घेऊन घरीच स्टार्टअप सुरू केले. त्यामुळे सुरवातीला या व्यवसायासाठी मला गुंतवणूक करावी लागली नाही. काही महिन्यांनंतर एक ऑफीस घेतले. पहिल्या एक - दोन महिन्यांत एक एक करून युवकांना रोजगार दिला. त्यानंतर जस जसा व्यवसाय वाढू लागला, तस तसे  ८ - ९ जणांना रोजगार दिला. सुरवातीला छोट्या जागेत व्यवसाय केला. दोन वर्षांनंतर मोठ्या जागेत अधिक जणांना बरोबर घेऊन काम सुरू केले. सध्या आपल्या कंपनीत २० जण अगदी मन लावून काम करतात. त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच कंपनी प्रगतीकडे झेपावत आहे. सध्या आपल्या कंपनीची ५० लाखांची आर्थिक उलाढाल आहे. येत्या दोन वर्षात ही उलाढाल २ कोटी रुपयांपर्यंत पोचविणार असून त्याद्वारे आणखी ४० युवकांना रोजगार मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे, असे विरेश वझिरानी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या