ताळगाव पंचायतीच्या महसुलात २० लाखांची वाढ

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सरपंच डिकुन्हा यांची माहिती ः कोरोना काळातही जनतेकडून कर भरणा

पणजी: राज्यातील सर्वात जास्त महसूल प्राप्त करणारी दुसऱ्या क्रमांकाची पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताळगाव पंचायतीच्या महसुलात यंदा कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विविध करातून पंचायतीत गतवर्षापेक्षा येणारा महसूल यंदा २० लाख रुपयांनी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

पणजी शहराला लागून असलेल्या ताळगाव पंचायतीचा भाग अनेक बाजूने विकसित समजला जातो. येथील पंचायत क्षेत्रात असलेल्या विविध सोसायट्‍या त्याचबरोबर गृहनिर्माण संकुले यांच्या माध्यमातून पंचायतीच्या महसुलात भर पडत आहे. पंचायत याच महसुलाच्या माध्यमातून पंचायतस्तरावरील आवश्‍यक त्या सुविधा निर्माण करण्याचे काम करते. गतवर्षी २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात पंचायतीला २ कोटी ३८ लाख ४९ हजार ४८० रुपयांचा महसूल विविध करांतून जमा झाला होता. घरपट्‍टी, व्यवसायिक कर, साइनबोर्ड कर आणि कचरा संकलन कर असे चार प्रकारचे कर आकारते. त्यात पंचायतीला घरपट्‍टी आणि कचरा करातून सर्वाधिक महसूल मिळतो. 

याबाबत सरपंच आग्नेल डिकुन्हा यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असतानाही लोकांनी पंचायतीचे विविध कर भरून चांगले सहकार्य केले आहे. पंचायत अनेक विकास कामे आपल्या स्वनिधीतून करीत आहे. ताळगावातील जनतेसाठी पंचायत काम करीत आहे, सध्या पंचायतीने वृक्षारोपणाचे आणि पालेभाज्या लागवडीचे काम केले आहे. त्याशिवाय घरोघरी कचरा संकलन करण्याचे काम पंचायत करीत असून, अद्याप ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणीही कचरा टाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यासाठी लोकांनी पंचायतीला सहकार्य करण्याची गरज असून, कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या माणसाकडे कचरा द्यावा, असे आवाहन असल्याचे ते म्हणाले. 
 

संबंधित बातम्या