गोव्याचे भवितव्य ‘आप’च्या हाती!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता कॉंग्रेसमधून ‘आप’मध्ये नेते कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत.

पणजी: गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता कॉंग्रेसमधून ‘आप’मध्ये नेते कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत. आज कॉंग्रेसच्या समाजमाध्यम प्रभारी तथा महिला कॉंग्रेसच्या सचिव रोशनी डिसिल्वा यांनी विसेक जणांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला.

पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, गोमंतकीयांना ‘आप’ हाच सक्षम राजकीय पर्याय असल्याचे पटले आहे. पक्षात येण्यास अनेकजण इच्छूक आहेत. त्यांना टप्प्या टप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहे. कॉंग्रेस आणि भाजपने जनतेला भ्रमनिरास केला असून केवळ गोव्याचे भवितव्य ‘आप’च्या हाती सुरक्षित असल्याचे गोमंतकीयांनी मनोमन ठरवले आहे. युवा वर्ग पक्षाकडे आकृष्ट होत आहे. यावरूनच भविष्यात पक्षाची स्थिती किती बळकट असेल हे दिसून येते. ‘आप’चा संदेश हा व्यापक व मुक्त आहे, जो कोणी गोव्याच्या हितासाठी काम करण्यास तयार असेल त्याला आम्ही व्यासपीठ देऊ.

गोवा लेखानुदान विधेयकाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी 

‘आप’मध्ये आज सामील झालेल्यांमध्ये एलाईन फर्नांडिस, वेंझी फर्नांडिस, ज्योती गावस, आसिफा शेख आणि महिला कांग्रेसच्या कार्यकारी समिती सदस्य अँड्रिया डायस, कॉंग्रेस अनुसूचित जमाती समितीचे कार्यकारी समिती सदस्य कांता गावडे यांचा समावेश होता.इस्टरच्या पूर्वसंध्येला ''आप'' मध्ये सामील होणे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे रोशनी म्हणाल्या आणि त्या चार वर्षांपासून प्रतिमा यांच्यासोबत कशा प्रकारे काम करत आहे, याची त्यांनी आठवण केली. 

आंबा उत्पादनाचा आधीच उल्हास, त्यात कोरोनाचा फाल्गुनमास! 

मी कांग्रेससाठी गेली 20 वर्षे काम केले आहे, पण त्या पक्षाकडून माझे काम कधीच ओळखले गेले नाही किंवा त्याचे महत्त्व पटले नाही आणि नेहमीच आपल्याला दुर्लक्षित केल्यामुळे आपण आपमध्ये सामील होण्याचे ठरवले. आता मी पेडणे ते काणकोणपर्यंत पक्षासाठी काम करेन, गावडे म्हणाले.
कुतिन्हो म्हणाल्या की, ही केवळ एक सुरुवात आहे आणि बरेच लोक आता कांग्रेसमधून आपमध्ये सामील होणार आहेत, कारण आता अनेकांना वाटते की कॉंग्रेस हे “बुडणारे जहाज” बनू लागले आहेत

म्हांबरे यांनी पक्षाच्या सर्व नवीन सदस्यांचे स्वागत करताना म्हटले की, गोव्या संदर्भातील सर्व निर्णय दिल्लीतील श्रेष्ठींची वाट पाहण्याऐवजी गोव्यातीलच पक्ष नेते स्वतः घेतील, विशेषत: तरुण आपच्या "गोवा हा गोमंतकीयांसाठी आहे" या उद्देशाकडे पाहून त्यांच्याकडे आकर्षित होत आहेेत.  ‘आप’ने पालिका निवडणुकीत कोणतेही पॅनेल उभे केले नाही, परंतु आमचे काही कार्यकर्ते निवडणुक लढवत असलेल्या ठिकाणी पक्षाने त्यांना शक्य तितके सहकार्य केले. प्रतिमा यांनी निवडणूक लढविणाऱ्या दोन कार्यकर्त्यांसाठी केपेमध्ये प्रचार केला.

संबंधित बातम्या