अजूनही दर दिवशी दोन हजार कोरोना चाचण्यांची प्रतीक्षाच..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

ज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवसाला कोरोनाच्या नमुन्यांच्या चाचण्या दोन ते अडीच हजारांपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा दिवस ओलांडले, पण अद्याप दोन हजारांच्या चाचण्यांची संख्या आरोग्य खात्याने काही ओलांडली नाही, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. 

पणजी : राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवसाला कोरोनाच्या नमुन्यांच्या चाचण्या दोन ते अडीच हजारांपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा दिवस ओलांडले, पण अद्याप दोन हजारांच्या चाचण्यांची संख्या आरोग्य खात्याने काही ओलांडली नाही, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. 

मागील आठवड्यात शुक्रवारी आरोग्यमंत्री राणे यांनी कोरोनाविषयीच्या तज्‍ज्ञांच्या समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांना वरील माहिती दिली होती. परंतु अजूनही दोन हजार चाचण्या काही दिवसाला होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोक चाचण्यांसाठी पुढे येत नसावेत, अशी शंका येते. मंत्री राणे यांनी त्यावेळीसुद्धा कोरोनाच्या चाचण्या घटण्यामागे हेच कारण दिले होते. अनेक लोकांना घरगुती विलगीकरणाची भित्तीपत्रिका आपल्या दारावर लावलेली नको आहे. अनेक लोक आजार गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत असल्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.

कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या म्हणजे रुग्णसंख्या कमी झाले, असा काहीजणांकडून अंदाज वर्तविला जातो. दुसऱ्या बाजूला राज्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९०च्या वर आहे. ही बाब समाधानाची मानावी लागेल. परंतु ज्यापद्धतीने चाचण्यांची संख्या अजूनही वाढत नाहीत, घेतलेल्या चाचण्यांमागे नक्की किती पॉझिटिव्ह येतात, हे सर्व पाहिल्याशिवाय राज्यातील कोरोनाच्या संक्रमणात घट झाली, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

संबंधित बातम्या