राज्‍यात २४ टक्के पदवीधर बेरोजगार

Sanathkumar Fadte
गुरुवार, 30 जुलै 2020

महाविद्यालयातून मिळालेली पदवी नोकरी मिळण्याची शाश्‍वती देऊ शकत नाही. पदवीधर असलेल्या युवक - युवतींची स्थिती बारावी उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार युवक -युवतींसारखीच आहे. तसेच बेरोजगार युवकांच्या नोकरी व पगाराची अपेक्षा आणि उपलब्ध असलेल्या नोकऱ्या यामध्ये ताळमेळ न बसल्‍यामुळेही बेरोजगारीच्‍या समस्‍येत आणखी भर पडत आहे. राज्‍यात २४ टक्के पदवीधर बेरोजगार आहेत.
 

सनथकुमार फडते

पणजी :

महाविद्यालयातून मिळालेली पदवी नोकरी मिळण्याची शाश्‍वती देऊ शकत नाही. पदवीधर असलेल्या युवक - युवतींची स्थिती बारावी उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार युवक -युवतींसारखीच आहे. तसेच बेरोजगार युवकांच्या नोकरी व पगाराची अपेक्षा आणि उपलब्ध असलेल्या नोकऱ्या यामध्ये ताळमेळ न बसल्‍यामुळेही बेरोजगारीच्‍या समस्‍येत आणखी भर पडत आहे. राज्‍यात २४ टक्के पदवीधर बेरोजगार आहेत.

विधानसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मजूर व रोजगार खात्याच्या मंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात यांनी दिलेल्या माहितीमुळे ही आकडेवारी स्पष्ट झाली. मजूर आणि रोजगार खात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील बेरोजगारांत पदवीधर युवकांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. हे प्रमाण २४ टक्के आहे. तसेच बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांचे प्रमाण २३.५ टक्के आहे. त्‍यानंतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार युवक -युवतींचा क्रमांक लागतो. त्‍यांचे बेरोजगारीचे प्रमाण १९.५ टक्के एवढे आहे.

४७ हजार ६२९ बेरोजगारांची नोंदणी
श्रमशक्ती भवन, पणजी येथील इमारतीच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विभागामध्ये नोंदणीकृत झालेल्या बेरोजगारांची एकूण संख्‍या ४७ हजार ६२९ एवढी आहे. यामधील ११ हजार ३३० युवक - युवती पदवीधर आहेत, तर ११ हजार २०१जण बारावी उत्तीर्ण झालेले आहेत. ९ हजार २८७ जण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आहेत, तर ५ हजार २५०जण दहावी उत्तीर्ण आहेत. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगारांचे प्रमाण ३ हजार १९ एवढे आहे, तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ३ हजार ४९४जणांनी आणि पीएचडी पूर्ण केलेल्या २६ जणांनी बेरोजगार म्हणून आपली नोंदणी केलेली आहे. ही तपशीलवार माहिती रोजगार आणि मजूर कल्याण खात्याच्या मंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात बोलताना उघड केली.

राज्याचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सध्या केंद्र सरकारच्या नॅशनल करिअर सर्विस पोर्टलचा एक भाग बनलेले आहे. या सध्याच्या प्रणालीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला एनसीएस (नॅशनल करियर सर्विस ) पोर्टलवर नोंदणीकृत व्हावे लागते.

खासगी क्षेत्रातील ज्या कंपन्या २५ पेक्षा जास्‍त संख्येने रोजगार देतात. त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज यांच्‍यामार्फत येतात. त्‍यामुळे नोकरीसाठी रिक्त जागा भरावयाच्‍या असतील किंवा नवीन नोकऱ्या निर्माण झाल्यावर असतील, तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि रोजगार व मजूर खात्याला अधिसूचना जारी करून अधिकृतपणे कळवावे लागते. मजूर खात्याच्या पोर्टलमुळे निर्माण झालेल्या नोकऱ्यांचा तपशील सरकारच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला द्यावा लागतो. या नियमामुळे ६६४ नवीन नोकऱ्या निर्माण झाल्यावर, या नोकऱ्यांचा तपशील खात्याला मिळाला.
- जेनिफर मोन्सेरात (मजूर व रोजगार खात्याच्या मंत्री)

 

- महेश तांडेल

 

संबंधित बातम्या