काकोड्यातील प्रकल्पाचे २५ कोटी कुणासाठी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

काकोडा-कुडचडे येथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे कचरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला कुडचडेवासियांनी सुरवातीपासून विरोध केला होता. पण, प्रत्येकवेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकांची समजूत काढत होते. त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीला किंवा कंत्राटदाराला एक पैसा देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते

कुडचडे:  काकोडा-कुडचडे येथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे कचरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला कुडचडेवासियांनी सुरवातीपासून विरोध केला होता. पण, प्रत्येकवेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकांची समजूत काढत होते. त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीला किंवा कंत्राटदाराला एक पैसा देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. परंतु सद्यःस्थितीत प्रकल्पाचे काम शून्य असतानाही या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये मंजूर हे कुणासाठी मंजूर केले आहेत, असा सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांना  विचारला आहे.

काकोडा कचरा प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगतात मंत्री लोबो यांनी सांगितल्याने हे पैसे नेमके कुणासाठी मंजूर केलेत, याचा खुलासा करावा, अशी मागणी कुडचडे काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत गावस देसाई, विन्सन्ट डिसोझा, संजय नाईक, अली शेख, राजू प्रभू देसाई, मनोहर नाईक व तेजस सावंत देसाई उपस्थित होते. 

कचरा प्रकल्पासाठी ६५ हजार चौ. मी. जमीन कुडचडे पालिकेची. पण, ही जमीन सरकारने ताब्यात घेतली की, पालिकेने दिली या संदर्भात पालिकेने अद्याप स्पष्ट केले नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांनी जमिनीविषयी करार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु नगराध्यक्ष म्हणतात, आपल्याला या जमिनीविषयी काहीच माहिती नाही. हा प्रकार पाहता पालिकेला संपविण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रकल्प आपल्या मतदारसंघात नेण्यासाठी सेटिंग केले जात आहे. मग काकोड्यातील कचरा प्रकल्पात कुणाचे सेटिंग आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सावंत म्हणाले.
सालीगाव येथील प्रकल्प झाला. पण, तरीही काकोडा येथील प्रकल्प पूर्ण होत नाही. एका वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या प्रकल्पासाठी एक पानही हलले नाही. कदाचित सरकारकडून पैसे मिळविण्याची प्रतीक्षा करण्यात आली, असावी. कारण यात सेटिंग ठरलेले असण्याचा आरोपही काँग्रेसने 
केला.

...तर पालिकेचे नाव सांगून 
कुणीही पैसे गोळा करेल

कुडचडे पालिका मजुरांची एक पिढी संपली. दुसरी पिढी कामाला नेमण्यात आली. पण, त्यांना राहण्यासाठी छोटीशी जागा पालिकेकडे आजपर्यंत उपलब्ध करण्यात आली नाही. सत्ताधारी पालिका असून काय फायदा? असा प्रश्न पुष्कल सावंत यांनी करून पालिका मंडळ बैठकीत एकही शब्द काढत नसल्याचा आरोप केला. पालिका घरपट्टी वसुलीसाठी कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदारामार्फत खास माणसे नेमून वसुली करतात. या कामासाठी पालिकेची माणसे नाहीत काय? उद्या पालिकेचे नाव सांगून कोणीही पैसे गोळा करेल, अशी भीतीही कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात आली.

कंत्राटदाराची नेमणूक कुणाच्या फायद्यासाठी 
कचरा गोळा करण्यासाठी कुडचडे पालिका बैठकीत विचार विनिमय करून संपूर्ण कचरा पालिकेने गोळा करण्याचे ठरविले होते. याकामी पालिका मजूर, वाहने उपलब्ध आहे. पण, पालिकेला कमी लेखण्यासाठी की स्वतःच्या फायद्यासाठी आमदार नीलेश काब्राल यांनी कचरा उचल करण्याचे काम सुरू केले, ते स्पष्ट करायला हवे. कारण त्यानंतर अचानक हेच काम करोडो रुपये देऊन कंत्राटदारामार्फत केले जात आहे. मजूर पालिकेचे, वाहने पालिकेची, डिजेल, मोडतोड पालिकेची, मग कंत्राटदाराला वार्षिक एक करोडच्या वर निधी का दिला जातो. एकीकडे कचरा गोळा करण्यासाठी वार्षिक एक कोठीच्यावर निधी दिला जात असताना दुसऱ्या बाजूने पालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येते. मग कचरा गोळा करण्यासाठी कंत्रादार कोणाच्या फायद्यासाठी नेमणूक करण्यात आली, असा प्रश्न काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत यांनी उपस्थित केला आहे. 

संबंधित बातम्या