राज्यातील २५ गाव मोबाईल मनोऱ्याविनाच

Dainik Gomantak
रविवार, 21 जून 2020

ऑनलाईन शिक्षणापुढे मोठा अडथळा, टेलिकॉन कंपन्यांही हतबल

अवित बगळे
पणजी

सरकारने ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नाही असे स्पष्ट केले असले तरी अनेक विद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र या साऱ्यात गावात नसलेले इंटरनेट आणि मोबाईलची रेंज ही प्रमुख समस्या उभी ठाकली आहे. राज्यातील २५ गावांत मोबाईलचे मनोरेच नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही ठिकाणी मोबाईलचे मनोरे उभारण्यास स्थानिक ग्रामस्थ करत असलेला विरोधही याला कारणीभूत असल्याचेही माहितगार सुत्रांनी सांगितले.
राज्यभरात मोबाईलचे २ हजार ४४ मनोरे असूनही काही गावात एकही मनोरा नाही अशी परिस्थिती आहे. सुमारे २५ लाख मोबाईल ग्राहक राज्यात आहेत. प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याकडे एकापेक्षा जास्त सीमकार्डे असतात. काही ठिकाणी एका विशिष्ट कंपनीची मोबाईल रेंज मिळत नसल्यामुळे दुसरे सिम बाळगले जाते. राज्यात मोबाईलवर इंटरनेटचा वापर होत आहे मात्र त्यात टाळेबंदीच्या काळात केवळ १२ ते १५ टक्केच वाढ झाल्याची माहिती काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना मिळाली. या काळात विविध संपर्क ॲप्स मात्र डाऊनलोड करण्यात आली. त्याचे प्रमाणही काही लाखांत असल्याचे सांगण्यात आले आहे. एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की दिवसभरात २५० टीबी डेटाचा वापर टाळेबंदीपूर्वीच्या काळात राज्यभरातील ग्राहक करत होते त्यात टाळेबंदीच्या काळात ४१२ टीबीपर्यंत वाढ झाली होती.
राज्याच्या लोकसंख्येच्या (१५ लाख) मोबाईल ग्राहकांची संख्या वाढती असली तरी त्या तुलनेत मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी पायाभूत सुविधांत वाढ केलेली नाही. मोबाईल मनोऱ्यांतून निघणाऱ्या लहरींची भीती वाटत असल्याने आमच्या गावात मोबाईल मनोरे नको अशी भूमिका अनेक ठिकाणी घेण्यात आली त्याचा फटका मोबाईल कनेक्टीव्हिटीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

या ठिकाणी एकही मनोरा नाही
१) रेवोडा, रेवोडा देवस्थान परीसर
२)आके बायशमधील मडगाव कॅंप परिसर
३) कामुर्ली क्षेत्रातील लोटली
४) शेल्डेतील कामालीवाडा
५) उसगाव गांजेतील एमआरएफ नेस्ले
६) जुनेगोवेतील गवंडाळी रेल्वे फाटक
७) लाटंबार्सेतील लाडफे
८) आगोंदमधील क्युबा आगोंद
९) कालेतील काले कुळे स्टेशन
१०) सांगे पालिका क्षेत्रातील साळावली धरण परिसर
११) वेर्णा येथील आयॉन एक्सेंज
१२) लोलयेतील लोलये स्टेशन
१३) पेडणे पालिकेतील पेडणे महामार्ग
१४) सांतआंद्रेतील गोवा वेल्हा
१५) तोरसे
१६) सावर्डेत रेल्वे निवासस्थाने
१७) मयेतील तिखाणे
१८) नावेलीत आमोण्यातील पिंग आयर्न प्लॅंट
१९) कोठंबी
२०) बार्देशमधील कामुर्ली
२१) साळमधील दोडामार्ग परिसर
२२)सारझोरा
२३) सावर्डेतील धाडे
२४) नेवरा
२५) लोलये पोळेतील माशे

 

संबंधित बातम्या