Goa: डेल्टा प्लसचेही सावट; 26 नमुने पॉझिटिव्ह

delta plus in goa
delta plus in goa

पणजी: कोविड विषाणूचा डेल्टा (Delta Variant) हा प्रकार राज्यात सापडला नसल्याचे सरकार ठामपणे सांगत होते. मात्र बुधवारी चार ठिकाणचे नमुनेच पुण्याला पाठवल्याचे सांगून सरकार काहीतरी दडवत असल्याचे स्पष्ट झाले. अद्यापही खासगी प्रयोगशाळांतील नमुन्यांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था सरकारने केलेली नाही. गेल्या महिनाभरात आरोग्य विभागाने पुण्याच्या एनसीसीएस प्रयोगशाळेला पाठवलेल्या 122  नमुन्यांपैकी 33 नमुन्यांचे पृथक्करण झाले. त्यातून 26रुग्ण हे डेल्टाचे आढळून आले आहेत. टक्केवारीचा विचार केला तर ती 70 एवढी होती. त्यामुळे राज्यात डेल्टा प्लस रुग्णाची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यानी (Cheif Minister) मात्र डेल्टा प्लस आढळला नसल्याचा पुनरुच्चार केला.  (26 Patients of Covid 19 Delta plus varient found in goa)

डेल्टा प्लस हा कोविड विषाणूचा प्रकार शेजारील सिंधुदुर्गात सापडल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. राज्याच्या सीमेवर काटेकोर तपासणीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी सरकारला प्रवासी घेऊन येत असलेल्या प्रमाणपत्रावरच अवलंबून रहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने सीमेवर आपल्या बाजूने तत्काळ चाचणी करून अहवाल देण्याची सोय केली आहे. अशा तत्काळ चाचण्यांचे अहवाल सध्याच्या परिस्थितीत किती विश्वासार्ह मानावेत, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सीमेवर खासगी प्रयोगशाळांना केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्याचे सरकारने सांगितले असले तरी तोपर्यंत डेल्टा प्लस विषाणू गोव्यात प्रवेश करणार नाही का, त्‍याचे उत्तर मात्र सध्या दृष्टिपथात नाही.

सरकारकडे खात्रीलायक माहिती नाही
डेल्टा प्लस या प्रकारचा विषाणू राज्यात सापडलाच नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. असे असले तरीही खासगी प्रयोगशाळांत कोविड चाचण्या केल्या जात असताना त्यापैकी केवळ व्हिक्टर इस्पितळातीलच नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे इतर प्रयोगशाळांत डेल्टा प्लस विषाणू सापडला आहे की नाही, याबाबत खात्रीलायक माहिती सरकारकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

डेल्टामध्ये सातत्याने बदल
राज्यात सापडलेल्या 26 रुग्णांत डेल्टा स्ट्रेनमध्ये अल्फाचा 1, गामाचे 6 रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये मिळणारे हे स्ट्रेन व्हेरीयंट असून ते आरोग्य प्रशासनाची काळजी वाढवणारे आहे. डेल्टा प्लस स्ट्रेन हा तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो. नवीन स्ट्रेनपैकी अल्फा स्ट्रेन हा युके (इंग्लंड) मधील असून बीटा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेमधील असल्याचे शास्त्रज्ञांची माहिती आहे. तर डेल्टा स्ट्रेन हा भारतामध्ये तयार झाला असून त्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत.

लसीचे दोन्ही डोस हाच उपाय

डेल्टा व प्लस या विषाणूने आता आरोग्य खात्याची चिंता वाढविली आहे. शेजारील महाराष्ट्रात हे रुग्ण आढळून आल्याने गोव्यातही काळजीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील साथीचे रोग विशेषज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विषाणूचा सामना करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. 

बेतोडकर म्हणाले, की कोरोना होऊ नये यासाठी जी काळजी घेतली जाते तशीच काळजी डेल्टा व्हेरियंट विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून घ्यायला हवी. मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. 

कोरोनावर जी उपचार पध्दती वापरली जाते, तीच डेल्टावरही वापरली जाते. लस डेल्टावरही परिणामकारक ठरते. त्यामुळे सर्वांनी ती घ्यावी. गोव्यात आत्तापर्यंत ३३ डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते, त्यातील बहुतांश बरेही झाले. डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण मात्र गोव्यात अद्याप नाहीत.

खासगी इस्पितळेही उपचार प्रक्रियेत

कोविड रुग्णावर उपचारासाठी सरकारी इस्पितळे सुरू ठेवली आहेत. खासगी इस्पितळांनाही उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. डेल्टाचे बरेच लोक बरेही झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com