वेबसाइट्‍स कार्यान्वित करण्यात बार्देशमधील २७ पंचायती अपयशी

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

पंचायत संचालकांनी वारंवार कळवूनही वेबसाइट्‍स कार्यान्वित करण्यात बार्देशमधील बहुतांश पंचायती अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. या तालुक्यातील ३३ पैकी केवळ ७ पंचायतींनी आतापर्यंत स्वत:च्या वेबसाइट्‍स कार्यान्वित केल्याची माहिती म्हापसा येथील गट विकास अधिकारी कार्यालयातून मिळाली.

म्हापसा:  पंचायत संचालकांनी वारंवार कळवूनही वेबसाइट्‍स कार्यान्वित करण्यात बार्देशमधील बहुतांश पंचायती अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. या तालुक्यातील ३३ पैकी केवळ ७ पंचायतींनी आतापर्यंत स्वत:च्या वेबसाइट्‍स कार्यान्वित केल्याची माहिती म्हापसा येथील गट विकास अधिकारी कार्यालयातून मिळाली.

या कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बार्देशमधील हळदोणे, हडफडे-नागवा, बस्तोडा, कांदोळी, पर्रा, पोंबुर्पा व वेर्ला-काणका या सात पंचायतींनी यासंदर्भातील कार्यवाही करून त्या वेबसाइट्‍स कार्यान्वितही केल्या आहेत. बार्देशचे गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्याशी यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते गेले दोन दिवस विविध बैठकांत तसेच कार्यालयीन कामकाजात व्यग्र असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या तालुक्यातील जवळजवळ अन्य सर्वच पंचायतींनी आतापर्यत यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली असली तरी त्यासंदर्भातील एकंदर प्रक्रिया अतिशय धिम्या गतीने चाललेली आहे. याबाबत संबंधित पंचायती गांभीर्य दाखवत नाहीत, हेच यातून स्पष्ट होत आहे.

काही पंचायतींनी त्यासंदर्भात निविदा मागवलेल्या आहेत. काही पंचायतींनी आलेल्या निविदांपैकी निवड केली असली तरी त्यासंदर्भातील काम पूर्ण झालेले नाही. याव्यतिरिक्त अन्य एक-दोन पंचायतींनी प्रत्यक्षात वेबसाइट्‍स कार्यान्वित केल्या असू शकतात; पण, त्यासंदर्भातील अहवाल अद्याप गट विकास कार्यालयाला पाठवण्यात आला नाही, असे त्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. काही पंचायतींनी कोविड महामारीचे कारण पुढे करून वेबसाइट कार्यान्वित करण्याचे काम ताटकळत ठेवले असल्याचे आढळून आले आहे. 

दरम्यान, अलीकडेच शिवोली-मार्ना पंचायतीने अलीकडेच स्वत:ची वेबसाइट कार्यान्वित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

या विषयासंदर्भात बस्तोडा पंचायतीचे सरपंच रणजित उसगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की आमच्या पंचायतीने वर्षभरापूर्वीच वेबसाइट कार्यान्वित केली आहे. त्यामुळे, पंचायत संचालकांनी अथवा गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याबाबत स्मरणपत्र पाठवण्याची आवश्यकताच भासलेली नाही.

संबंधित बातम्या