गोवा: ‘एटीएम’ला स्किमर लावणारी टोळी गजाआड

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

३ बल्गेरियनसह पाचजणांना अटक, लॅपटॉप व स्किमिंग कॅमेरे जप्त 

पणजी: गोव्यातील विविध भागात एटीएम मशिन्सना स्किमर बसवून बनावट एटीएम कार्ड तयार करून बँक खात्यावरील रक्कम काढणाऱ्या बल्गेरियनच्या तिघांच्या टोळीसह एकूण पाचजणांना गोवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून काही लॅपटॉप, स्किमिंग कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यातील कोणत्या भागात हे गुन्हे केले आहेत त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये स्टीव्हन लाझारोव्ह, हुसेन व राडास्लोव अशी आहेत. बँक खातेवरील रक्कम एटीएम कार्डने काढली नसली तरी खात्यावरील रक्कम काही अज्ञातांकडून काढली जात असल्याच्या तक्रारी पोलिस स्थानकाकडे आल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन उत्तर गोवा पोलिसांनी सायबर कक्षातील तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माहितीवरून सापळा रचला व या संशयितांना गजाआड करण्यासाठी वेगवेगळी  पोलिस पथके तयार करण्यात आली.  

पणजी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पणजी व जुने गोवे भागात एटीएम कार्ड स्वॅपिंग मशिन्स घेऊन स्किमिंग करण्यास दोन तरुण फिरत असल्याची माहिती 
मिळाली.

 त्यानुसार अब्दुल कादर व गुरप्रित सिंग या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
याप्रकरणी पणजी व पर्वरी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी राज्यातील इतर कोणत्या एटीएम मशिन्समध्ये स्किमर बसवून ही अनधिकृत एटीएम कार्डे तयार केली आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित बातम्या