गोव्यात 24 तासात कोरोनाचे 3 बळी; एसओपी पालनाचे आरोग्यमंत्र्यांनी केलं आवाहन

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

जे लोक कोरोना नियंत्रणासाठीची ‘एसओपी’ पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

पणजी:  (3 victims of corona in 24 hours in Goa Health Minister appeals for SOP compliance) आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी तिघा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जे लोक कोरोना नियंत्रणासाठीची ‘एसओपी’ पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा दिला आहे. लोकांनी सावधगिरी बाळगावी, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

कोरोना संसर्ग होऊन मृत झालेल्‍यांत मडगाव येथील एका 68 वर्षीय, बेती येथील 61 वर्षीय व म्हापसा येथील एका 73 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे तीन बळी गेल्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 818 वर पोहोचली आहे. आज दिवसभरामध्ये 1435 कोरोनासाठी पडताळणी चाचणी घेण्‍यात आली. त्यामध्ये 98 नवे कोरोना संसर्गित रुग्ण सापडले, तर कोरोनावर उपचार घेणारे 79 रुग्ण आज दिवसभरात बरे झाले. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 1013 एवढी आहे. (3 victims of corona in 24 hours in Goa Health Minister appeals for SOP compliance)

राज्यात नवीन कोरोना संसर्गित व्यक्तींची संख्या जशी वाढत आहे तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांत भितीचे वातावरणात पसरले आहे. ढवळी येथील एका वसतिगृहातील 18 विद्यार्थी आज कोरोना संसर्गित झाले. त्‍यामुळे तेथे मायक्रो कंटेन्‍मेंट झोन जाहीर केला आहे.राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी गोव्यातील नागरिक व पर्यटकांनी राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केलेल्या कोरोना नियंत्रण नियमावलीचे अर्थात ‘एसओपी’चे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. 

दक्षिण गोव्यातील राजकीय नेत्याच्या मुलाकडून युवतीस मारहाण; काँग्रेसकडून...

ते पुढे म्हणाले, जे लोक ‘एसओपी’ पाळणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गोव्यातील नागरिकांबरोबरच गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनीही एसओपीचे पालन करावे व राज्यात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारला सहकार्य करावे. मास्क लावून बाहेर पडणे, सोशल डिस्टंसिंग राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मोठ्या संख्येने गर्दीच्या ठिकाणी न जाणे आदी नियम जर लोकांनी पाळले तर गोव्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे. आरोग्य खाते गोव्यामध्ये कोरोना नियंत्रित रहावा, यासाठी शक्य ते सर्व उपाय करत आहे.

आरोग्य खात्याच्या या प्रयत्नांना लोकांची साथ हवी, तरच कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. नपेक्षा तो वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वच क्षेत्रांमध्ये सर्व व्यवहार खुले झालेले आहेत. त्यामुळे जास्त कडक बंधने घालणे शक्य होत नाही. तरीसुद्धा लोकांनी जर संयम पाळला आणि कोरोना नियमावलीचे पालन करून आपला व्यवहार चालू ठेवला तर नक्कीच कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये पर्यटक येत आहेत आणि ते कोरोना एसओपीचे पालन करत नसल्याचे दिसून आलेले आहे. आपण अशा पर्यटकांनाही ‘एसओपी’ पाळण्याचे आवाहन करत आहे. राज्यातील जे हॉटेल व रेस्टॉरंट चालक  कोरोना नियंत्रणाचे नियम पाळत नाहीत. त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्री राणे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या