विधानसभा रिंगणात ३० उमेदवार उतरवणार

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

प्रादेशिक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष नेहमीच लोकांचे हिताचे प्रश्‍न घेऊन वाटचाल करत आहे.  गोव्याच्या हिताविरोधात असलेल्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे गोव्याला प्रादेशिक पक्षच वाचवू शकतो असे लोकांचे मत झाले आहे. पक्षानेही आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे व कमाल ३० उमेदवार उतरवणार असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी दिली. 

पणजी : प्रादेशिक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष नेहमीच लोकांचे हिताचे प्रश्‍न घेऊन वाटचाल करत आहे.  गोव्याच्या हिताविरोधात असलेल्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे गोव्याला प्रादेशिक पक्षच वाचवू शकतो असे लोकांचे मत झाले आहे. पक्षानेही आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे व कमाल ३० उमेदवार उतरवणार असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी दिली. 

बार्देश तालुक्यातील सर्व मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार उतरविले जाणार आहेत. त्यापैकी थिवी, शिवोली, हळदोणे व साळगाव या चार मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित झाले आहेत. थिवी व हळदोणे मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढविणार आहे. मांद्रे या मतदारसंघातून दिपक कळंगुटकर यांना घोषित करण्यात आले आहे.

उमेदवारांची नावे घोषित करून त्यांना काम करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची या पक्षाची प्रथा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराला आमिषे दाखवून लटकत ठेवले जात नाही. राष्ट्रीय पक्ष उमेदवारी देण्याची आमिषे अनेकांना दाखवतात मात्र प्रत्यक्षात उमेदवार ठरविण्याचा निर्णय त्यांचे केंद्रीय नेते घेतात. गोवा फॉरवर्डने निवडलेला उमेदवार हा इतर पक्षांप्रमाणे ऐनवेळी बदलला जात नाही. भाजप सरकार सत्तेवर असले तरी त्यांच्याविरोधात गावागावात आंदोलने होत आहेत. त्यांचे दिवस भरले आहेत त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांना लोक योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेचा कल पूर्वी काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षाकडे होता मात्र त्यांना आता कळून चुकले आहे की, गोव्याच्या हितासाठी स्थानिक प्रादेशिक पक्षच लोकांच्या समस्या समजून घेऊ शकतो. त्यांच्यावर केंद्राकडून दडपण येऊ शकत नाही व ते स्वतः निर्णय घेऊ शकतात, असे किरण कांदोळकर म्हणाले.

गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसशी संवाद साधला होता असा प्रश्‍न पत्रकारांनी किरण कांदोळकर यांना केला असता ते म्हणाले, काँग्रेसशी मी संपर्क केला नाही मात्र भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्यांनीच माझ्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे काँग्रेसशी संपर्क मी साधल्याची खोटी माहिती देऊ नये. काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधल्याचे पुरावे आहेत ते उघड करावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. 

राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने पर्यटन व्यवसाय सुरू करून महसुलासाठी तरंगत्या कसिनोंना परवानगी देऊन गोमंतकियांच्या आरोग्याशी खेळ करू नये. अजूनही कोरोना महामारी संपलेली नाही. ब्रिटनमध्ये पुन्हा या महामारीने डोके वर काढले आहे त्यामुळे पुन्हा एकदा या देशाने ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात ६०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सरकारने गोमंतकियांना आरोग्य सुविधा देण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या