अटल सेतू वरील विद्युत यंत्रणेबाबत ३० कोटींचा घोटाळा: संजय बर्डे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

संजय बर्डे  म्हणाले, की अटल सेतूसंदर्भातील खर्चाबाबत मी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती जाणून घेतली असता तिथे कंत्राटानुसार ६६२ वीजखांब उभारले जाणार होते; पण, प्रत्यक्षात केवळ २५२ खांब लावले आहेत, तर ५४ खांब उभारायची प्रक्रिया सरू असल्याचे आढळून आल्याचा दावा त्यांनी केला.

म्हापसा: अटल सेतूवरील वीजखांब उभारणी व तेथील विद्युत यंत्रणेबाबत भाजपा सरकारने सुमारे ३० कोटी रुपयांचा महाघोटाळा केलेला आहे, असा दावा करून पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास त्यासंदर्भात पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी सांगितले.

 

पक्षाचे पदाधिकारी सतेश मोरे, रियाज शेख व बलभीम मालवणकर यांच्या उपस्थितीत दत्तवाडी-म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, की अटल सेतूसंदर्भातील खर्चाबाबत मी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती जाणून घेतली असता तिथे कंत्राटानुसार ६६२ वीजखांब उभारले जाणार होते; पण, प्रत्यक्षात केवळ २५२ खांब लावले आहेत, तर ५४ खांब उभारायची प्रक्रिया सरू असल्याचे आढळून आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, ३५६ खांब उभारायचे आहेत, असेही सांगण्यात आले; पण, बाकीचे खांब गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. हे सुमारे ४५.७० कोटींचे काम होते. निकृष्ट दर्जाचे काम पाहता यात मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. कंत्राटदाराने सादर केलेली निविदा व संमत झालेली निविदा यात मोठा फरक असल्याचा दावाही बर्डे यांनी केला. 

 

वीजबिलांवर पन्नास टक्के सवलत देणार असल्याचे सांगून गोवा सरकार गोमंतकीयांची दिशाभूल करीत असल्याचा दावा करून यासंदर्भात स्वत:चेच उदाहरण त्यांनी दिले. आपल्याला सुमारे साडेतीन हजार रुपयांचे वीजबिल आले असून, आपण त्याबाबत वीज खात्याच्या कार्यालयात चौकशी केली असता आल्याला केवळ सोळा रुपयांची सवलत मिळणार असल्याचे निष्पन्न झाल्याचे ते म्हणाले. केवळ फिक्स्ड चार्जीसवर पन्नास टक्के सवलत देण्याची खेळी सरकारने यासंदर्भात केल्याचा आरोपही श्री. बर्डे यांनी केला.

 

हणजूण वीज उपकेंद्राचे काम निविदा जारी न करता बाहेरच्या बाहेर देणे हासुद्धा वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून घडलेला मोठा घोटाळा आहे, असा दावा करून, या नियमबाह्य कृतीमुळे त्या परिसरातील हॉटेलमालकांशी वीजमंत्र्यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार केले असावेत, असे म्हणायला बराच वाव असल्याचा आरोपही श्री. बर्डे यांनी केला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या