म्हापशात 33 टक्‍के फेरीविक्रेत्यांना परवानगी

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

"सोपो' कराअभावी आर्थिक नुकसान झाल्याने पालिकेचा निर्णय

म्हापसा

म्हापसा पालिका बाजारपेठेत तीस टक्‍के फेरीविक्रेत्यांना सामाजिक अंतर ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आज शुक्रवारी म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.
म्हापसा बाजारपेठ २२ मार्चपासून फेरीविक्रेत्यांना बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे म्हापसा पालिकेला सोपो कराअभावी आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात पालिका आणखीन आर्थिक संकटात येऊ नये यासाठी आजच्या पालिका बैठकीत बाजारपेठेतील काही रांगांमध्ये सुमारे ३३ टक्‍के फेरीविक्रेत्यांना सामाजिक अंतर ठेवून बसण्याची परवानगी देण्याचे ठरले.
या बैठकीतील निर्णयानुसार, सध्या पालिका बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुरुमेंताचे साहित्य विक्री करणाऱ्या गोमंतकीय फेरीविक्रेत्यांना त्याच ठिकाणी बसण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच, पालिका बाजाराच्या मुख्य तीन रांगा दुचाकी वाहनांसाठी पार्किंग करण्यासाठी राखीव ठेवण्यात येतील. शकुंतला पुतळा परिसरात कुणालाच बसण्यास देण्यात येणार नाही.
म्हापसा पालिका बाजारात फेरीविक्रेत्यांना सामाजिक अंतर पाळून व मास्क वापरून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा ठराव नगरसेवक संदीप फळारी यांनी मांडला. तसेच, शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी पुरुमेंताच्या बाजारासाठी म्हापसा अर्बन बॅंकेजवळील टेम्पो स्थानकाचा परिसरात व मिलाग्रीस चर्चची परवानगी घेऊन चर्चसमोरील पार्किंगच्या जागेत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा ठराव मांडला व तो एकमताने संमत झाला.
बाजारपेठेतील सोपो कर गोळा करणारा ठेकेदार व पार्किंग कर गोळा करणारा ठेकेदार यांच्याबरोबर १ एप्रिल ऐवजी १ जूनपासूनच्या कालावधीसाठी करारावर सह्या कराव्यात, असे या वेळी ठरवण्यात आले. १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत बाजारपेठ फेरीविक्रेत्यांना बंद होती. त्यामुळे, दोन महिन्यांची सूट देण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती. त्यानुसार हा ठराव संमत करण्यात आला. गुरांना पकडण्यासाठी पालिकेने खरेदी केलेला लिफ्ट ट्रक गोमंतक गोशाळेच्या ताब्यात देण्याचा निर्णयही या वेळी झाला.
गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मरड भागात वेगळी सोय करण्यावर चर्चा झाली. या वेळी बोलताना मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा म्हणाले, तार नदीत घाणपाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत; तसेच, सोशल मीडियावरून त्या विषयावरून पालिकेवर टीका झाली होती. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व कामे बंद पडली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी पाईप्सचा वापर करण्यात आल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. यासंदर्भात पालिकेने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पाइपांचा पूल तोडून टाकण्याची मागणी केली होती व ती मान्य झाली होती; पण, कोरोनामुळे सर्व कामे स्थगित झाल्याने विलंब लागणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांनी नगरसेवकांना दिली.
नगरसेवक रोहन कवळेकर यांनी स्वत:च्या प्रभागातील नाल्यांची उंची वाढवण्याची मागणी केली व हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्याची मागणी केली. म्हापसा पालिकेने कदंब बसस्थानकासमोरील नव्या इमारतीतील गाळे, दुकाने तसेच मासळी मार्केटजवळील दुकाने व कार्यालये लवकरात लवकर भाडेपट्टीवर देऊन पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याची मागणी संदीप फळारी यांनी केली.
माहिती हक्‍क कार्यकर्ता जवाहर शेट्ये करोनासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी जारी केलेले नियम तोडून अभियंत्यांच्या समोर बसत आहेत. तेव्हा त्या अभियंत्याला मुख्याधिकाऱ्यांनी जाब विचारावा व शेट्ये यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फ्रॅंकी कार्व्हाल्हो यांनी या वेळी केली.
नगसेवक सुशांत हरमलकर, राजसिंह राणे, सधीर कांदोळकर, स्वप्नील शिरोडकर, मधुमिता नार्वेकर यांनी चर्चेत भाग घेतला. आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा होते. आमदार तथा नगरसेवक जोशुआ डिसोझा, क्‍लेन मदेरा, प्रशासकीय अधिकारी भानुदास नाईक व अठरा नगरसेवक या वेळी उपस्थित होत

संबंधित बातम्या