निपाणीत ३५ लाखांची गोव्‍याची दारू जप्त

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

वीट वाहतुकीच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या दहाचाकी लॉरीवर कारवाई करून सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बेळगाव: वीट वाहतुकीच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या दहाचाकी लॉरीवर कारवाई करून सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिक्‍कोडी अबकारी उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (ता. २६) रात्री पुणे-बंगळूर महामार्गावर निपाणी शहरातील राधानगरी रोड अंडरपासजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धनपालसिंग तोमर आणि राजू कंठी (दोघेही रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अबकारी खात्याचे सहआयुक्‍त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी दिलेली माहिती अशी 
 
एका दहा चाकी लॉरीतून गुजरातला गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे, गेल्या पंधरा दिवसांपासून चिक्‍कोडी उपविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाळत ठेवून होते. बुधवारी रात्री सदर वाहनाला निपाणी शहरातील राधानगरी रोड अंडरपास वळणावर थांबवून ही कारवाई करण्यात आली. लॉरीमध्ये दारू आहे हे समजू नये, यासाठी दोन कप्पे तयार करण्यात आले होते. मागे आणि वरील भागात विटा ठेवण्यात आल्या होत्या. तर त्या खाली दारूचे बॉक्‍स ठेवण्यात आले होते. दोघांना अटक करुन सदर वाहन बेळगाव अबकारी भवनाकडे नेण्यात आले. विटा खाली उतरविण्यात आल्या असता पंधरा लाख रुपये किमतीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे ६०० बॉक्‍स जप्त करण्यात आले. तसेच अन्य ब्रॅंडचे २० लाख किमतीची दारू मिळून एकूण ३५ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिक्‍कोडी विभागाचे अबकारी उपायुक्‍त के. अरुणकुमार, अबकारी उपअधीक्षक विजकुमार हिरेमठ व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
 

संबंधित बातम्या