कळंगुटमध्ये आयपीएल सट्टेबाजांचा सुळसुळाट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून आंध्रप्रदेशच्या चार सट्टेबाजांना अटक केली आहे. कळंगुट पोलिसांनी महिन्याभरात घातलेला हा चौथा छापा आहे तर राज्यातील सहावे प्रकरण आहे. 

पणजी - गेल्या काही दिवसांपासून गोव्यात आयपीएल सट्टेबाजांनी ठाण मांडले असून पोलिसांच्या दक्षतेमुळे एकापाठोपाठ एक प्रकरण उजेडात येत आहे. कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून आंध्रप्रदेशच्या चार सट्टेबाजांना अटक केली आहे. कळंगुट पोलिसांनी महिन्याभरात घातलेला हा चौथा छापा आहे तर राज्यातील सहावे प्रकरण आहे. 

या कारवाईत ३२ मोबाईल् फोन्स, मोबाईल कॉन्फरन्स बॉक्स, २ लॅपटॉप व रोख रक्कम १५ हजार ७८५ मिळून सुमारे ५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही सट्टेबाजी काल रात्री सुरू असलेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स या सामन्यावर लावली जात होती. अटक केलेल्यांची नावे अद्दुरी नागा राजू (४२ वर्षे), आयर्रीकी वेंकटा गणेश (२० वर्षे), पिथानी किशोर कुमार (४१ वर्षे), रुद्रा सूर्यनारायण राजू (३९ वर्षे) अशी असून हे सर्वजण आंध्रप्रदेशमधील रहिवासी आहेत. सट्टेबाजीसाठी ते गोव्यात आले होते व हॉटेलातून ते सट्टा स्वीकारत होते. याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाल्यावर पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.  

गोव्यातील आणखी काही ठिकाणी फ्लॅटमधून किंवा हॉटेलमधून आयपीएल सट्टेबाजी सुरू असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गोवा हे सट्टेबाजीसाठी सुरक्षित असल्याने परप्रांतीय युवक या सट्टेबाजीसाठी गोव्यात भाडेपट्टीवर फ्लॅट घेऊन राहत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ताळगाव येथे काल क्राईम ब्रँचने भाडेपट्टीवर घेतलेल्या फ्लॅटवर छापा टाकला होता व सट्टेबाजांना अटक करत सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती.

संबंधित बातम्या