चार पर्यटकांना जीवरक्षकांकडून जीवदान

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

तीन पुरुष व महिलेचा समावेश, वागातोर येथील घटना   

पणजी: वागातोर येथील समुद्रात आज दुपारी दीडच्या सुमारास चार पर्यटकांना बुडताना तेथील जीवरक्षकांनी वाचवत जीवदान दिले. यामध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश होता. वाचलेले हे पर्यटक हरियाणा व दिल्ली येथील होते. समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांना समुद्रात न उतरण्याची सूचना करूनही काही पर्यटक पाण्यात उतरल्याने ही घटना घडली.  

राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत असल्याने समुद्र खवळलेला आहे. वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पर्यटकांना पाण्यात न उतरण्याच्या सूचना करून पोहण्यासाठी सुरक्षित नसल्याचे सांगितले तरी काहीजण पाण्यात उतरले होते. वारंवार सांगूनही काहीजण समुद्रातून बाहेर येत नव्हते. दुपारी दीडच्या सुमारास काही पर्यटक खोल पाण्यात गेले होते. 

समुद्राच्या लाटांमुळे पाण्याच्या भोवऱ्यात एक महिला व तीन पुरुष पर्यटक पाण्यात ओढले गेले. पाण्यात गटांगळ्या खाताना या पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्याचवेळी तेथे असलेल्या इतर पर्यटकांनीही त्यांना वाचविण्यासाठी जीवरक्षकांना हाक दिली. यावेळी जीवरक्षक अमित शिंदे, किरण पवार, विजय परब व रुद्रेश महाले या चौघांनी समुद्रात बचावासाठीची बोर्डच्या सहाय्याने पर्यटकांपर्यंत पोहचून त्यांना बाहेर आणले. चौघेही पर्यटक हे २७ ते ३३ वयोगटातील होते. 

समुद्रात गटांगळ्या खाल्ल्याने चौघा पर्यटकांपैकी एकाची प्रकृती खालावली होती. रुग्णवाहिकेसाठी फोन करण्यात आला व ती येईपर्यंत त्या पर्यटकाला कृत्रिम श्‍वाच्छोश्‍वास देण्यात आला. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेला उपचारासाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल कऱण्यात आले.

संबंधित बातम्या