वास्कोत कोरोनाचे ४ बळी!

Baburao Rivankar
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीने वास्कोकरांनाच अधिक प्रमाणात घेरले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. आज मंगळवारी मेस्तावाडा, सडा, बोगदा, बायणा या परिसरातील चौघांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत वास्को, चिखली, नवेवाडे, सडा, बायणा, बोगदा, रुमडावाडा, झुआरीनगर, वेळसांव या मुरगाव तालुक्यातील परिसरातून ४०हून अधिक रुग्ण दगावले आहेत.

मुरगाव
आज मंगळवारी एकाच दिवशी आणखी तिघे रुग्ण दगावले, त्यात एका संगीत कलाकाराचा समावेश आहे. मुरगाव तालुक्यातील वास्को आणि कुठ्ठाळी या दोन्ही आरोग्य केंद्रात मिळून एकूण ६०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यांच्यावर मडगाव कोविड इस्पितळात तसेच काहींवर सडा एमपीटी इस्पितळ, शिरोडा कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुरगाव तालुक्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण गोवा प्रशासनाने मांगोरहिल, सडा, बायणा झुआरीनगर, खारवीवाडा हे परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले होते. त्यातील मांगोरहिल कंटेनमेंट झोन ७० दिवसांनंतर मुक्त करण्यात आला. तसेच बायणा आणि सडा या भागातील मायक्रो कंटेन्मेंट झोन मुक्त केले आहेत.
खारवीवाडा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोनमधून मुक्त करावा यासाठी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या समवेत खारवीवाड्यावरील मच्छिमारी लोकांना सोबत घेऊन मंगळवारी बैठक घेतली. त्या बैठकीत आमदार श्री. आल्मेदा यांनी झोन मुक्त करावा असा प्रस्ताव मांडला. खारवीवाड्यावर रुग्णांची संख्या शुन्यावर आल्याने तेथील लोकांना मुक्त करावे अशी मागणी श्री. आल्मेदा यांनी केली. यावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहे, असे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी यावेळी सांगितले.
सध्या वास्को परिसरात रुग्ण संख्या हळूहळू वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जी खबरदारी घ्यावयाची आहे. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे, पण त्याचे सर्रास उल्लंघन वास्को परिसरात होत असताना दिसत आहे. तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे नियम पायदळी तुडविले जात आहेत. वास्को मार्केटमध्ये तर मार्गदर्शक तत्वे खुंटीला टांगून व्ययवसाय केला जात आहे. तोच प्रकार सडा, बायणा, मांगोरहिल, नवेवाडे, आल्त दाबोळी, झुआरीनगर, कुठ्ठाळी या ठिकाणी दिसून येत आहे. कोरोनाची लागण होईल याची धास्ती मनात आहे, पण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या बाबतीत हयगय केली जात आहे. प्रवासी बसमध्येसुद्धा लोकांना कोंबले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसंर्ग वाढण्याची भीती आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या