अग्निशमन कक्षाला प्रतितासाला ४१ कॉल्स

अवित बगळी
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून तसेच मोडून पडण्याची तसेच काही गावामध्ये पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ होत आहे. आज (५ जुलै) गेल्या बारा तासामध्ये विविध ठिकाणी घडलेल्या घटनांबाबतचे ४९३ कॉल्स आले पैकी ३३४ घटनांस्थळी जाऊन दलाच्या जवानांनी कामे पूर्ण केली. प्रत्येक तासागणिक ४१ कॉल्स नोंद झाले आहेत.

पणजी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून तसेच मोडून पडण्याची तसेच काही गावामध्ये पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ होत आहे. आज (५ जुलै) गेल्या बारा तासामध्ये विविध ठिकाणी घडलेल्या घटनांबाबतचे ४९३ कॉल्स आले पैकी ३३४ घटनांस्थळी जाऊन दलाच्या जवानांनी कामे पूर्ण केली. प्रत्येक तासागणिक ४१ कॉल्स नोंद झाले आहेत. 
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत ४९३ कॉल्स आले आहेत. ३३४ प्रकरणे हातावेगळी करण्यात जवानांना यश आले आहे. ३५ ठिकाणी काम सुरू असून अजूनही १२४ घटनांच्या ठिकाणी जाऊन काम करणे प्रलंबित आहे. त्यामुळे या जवानांना रात्रंदिवस या पावसाच्या तडाख्यामुळे उद्‍भवलेल्या प्रसंगांना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. या खात्याकडे जरी मनुष्यबळ कमी असले तरी ठिकठिकाणी झाडे पडून होणारी वित्तहानी तसेच रस्त्यांची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवान काम करताना दिसत होते. 
वास्को अग्निशमन स्थानकाच्या आवारातील फक्त ४ कॉल्स आले आहेत तर सर्वाधिक कॉल्स पेडणे तालुक्यात नोंद झाले आहेत. या तालुक्यातील विविध भागात झाडे उन्मळून व मोडण्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी वित्तहानी झाली आहे. याव्यतिरिक्त पणजी (४६), म्हापसा (५१), डिचोली (५६), पेडणे (५८), वाळपई (२५), जुने गोवे (१७), मडगाव (४८), फोंडा (३६), कुडचडे (५१), काणकोण (४६), वेर्णा (११), कुंडई (१३) व पिळर्ण अग्निशमन स्थानकात (३१) कॉल्स नोंद झाले आहेत, अशी माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

साळ गावामध्ये गस्ती बोटी तैनात 
अग्निशामक दलाच्या बचाव व गस्ती बोटी साळ गावामध्ये तैनात ठेवण्यात आल्या आहेत. या साळ गावात पाण्याची पातळी वाढल्याने सावधगिरी बाळगण्यात येत आहे. डिचोली अग्निशमन स्थानकात जवानांचे अतिरिक्त पथक तैनात करून ठेवण्यात आले आहे. तसेच बंदर कप्तान कर्मचाऱ्यांचीही या गावात नेमणूक करण्यात आली आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या