"उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी घेईल"

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी घेईल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

पणजी: उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी घेईल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असे आज सांगितले.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींमध्ये मिळून भाजप ४१ जागांवर निवडणूक लढवत आहे. दक्षिण गोव्यातील सांकवाळ मतदारसंघातून भाजपच्या अनिता थोरात बिनविरोध निवडून आल्याने भाजपने खाते खोलले आहे. भाजप आता उत्तर गोव्यातून २५ आणि दक्षिण गोव्यातील १६ मतदारसंघात निवडणूक लढवत असून दोन्ही पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

कोविड संकटामुळे मार्चमध्ये जिल्हा पंचायतीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वीजमंत्री नीलेश काब्राल, ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांनी दोन्ही जिल्हा पंचायतींमधील सर्व मतदारसंघ पिंजून काढले होते.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या सोबत राज्यसभा खासदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, संघटन मंत्री सतीश धोंड, सरचिटणीस दामोदर नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष शीतल नाईक, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व मतदारसंघात भाजपची ध्येय धोरणे आणि विकासाची अंत्योदय संकल्पना मतदारांपर्यंत पोचवली आहेत.

मार्चमध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली, तेव्हा कोविड संकट काळात भाजपच्या सर्व उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्या बरोबरच टाळेबंदीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम केले आहे. 
परदेशात आणि देशात इतर ठिकाणी अडकून पडलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यात भाजपने राज्य आणि केंद्रस्तरावरून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली असल्याने मतदार त्याची पोचपावती मतदानातून देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी व्यक्त केला 
आहे.

आणखी वाचा:

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात -

गोव्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्घ आहे.त्यासाठी आवश्यक ती पावले उचलून कोविड संकटामधून सावरत पुन्हा गोव्याला अग्रेसर राज्य करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न केले जात असून लोकांची त्याला पसंती असल्याने 14 डिसेंबर रोजी निकालावेळी त्याचा प्रत्यय लोकांना येईल, असे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक म्हणाले.
सरकार भक्कम आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत असल्याने आधीच उध्वस्त झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली असून बेताल आरोप करून सरकार विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुज्ञ मतदार त्याला भूलणार नाही. दोन्ही जिल्हा पंचायतींमधील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा दावा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.

संबंधित बातम्या