तारांकित हॉटेलमध्‍ये ४२ पर्यटकांना अटक; कळंगुट येथील जुगारअड्ड्यावर छापा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

गेल्या काही दिवसांपासून कळंगुट भाग ड्रग्‍जमुळे चर्चेत असताना तारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. यावेळी जुगारअड्डा आयोजकांसह ४२ पर्यटकांना अटक झाली.

पणजी, शिवोली: राज्यात ‘कोविड - १९’ च्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक सूचना लागू असतानाही किनारपट्टी भागामध्ये रेव्ह पार्ट्या तसेच अवैध व्यवसाय सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कळंगुट भाग ड्रग्‍जमुळे चर्चेत असताना तारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. यावेळी जुगारअड्डा आयोजकांसह ४२ पर्यटकांना अटक झाली. त्यांच्याकडून १० लाख रुपये रोख, जुगार खेळण्यासाठीच्या ५७ लाखांच्या ५७३९ चिप्स व ५७ भ्रमणध्वनी संच (मोबाईल) व दोन एटीएम कार्ड स्वॅपिंग मशीन जप्त केली आहेत.  

कळंगुट पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह तारांकित हॉटेलवर टाकलेल्या छाप्यावेळी ज्या खोल्यांमध्ये हा जुगार सुरू होता त्या दोन अलिशान खोल्या सील केल्या आहेत. या हॉटेलचा गैरवापर जुगाराचा अड्डा चालविण्यासाठी केला जात असल्याने पंचायत व पर्यटन खात्याला पत्र पाठवून या हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यास विनंती केली जाणार आहे. 

अटक केलेल्‍यांत धनाढ्य व्‍यावसायिक
अटक केलेल्‍या पर्यटकांपैकी बहुतेकजण हे व्यावसायिक व धनाढ्य कुटुंबातील आहेत व ते २५ ते ४५ वयोगटातील आहेत. अटक केलेले संशयित पर्यटक हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाब, तेलंगणा, मध्यप्रदेश येथील आहेत. दोन वर्षापूर्वी कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचने ऑगस्ट २०१८ मध्ये मटका अड्ड्यावर छापा टाकून २९ जणांना ताब्यात घेतले होते त्यानंतरची जुगाराविरुद्धची पोलिसांची दुसरी मोठी कारवाई आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्यांची आज दुपारी जामिनावर सुटका झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दोन खोल्‍यांत मांडला होता जुगार
येत्या आठवड्यापासून ‘आयपीएल’ क्रीडा स्‍पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी सट्टेबाजी करणारे गोव्यातील हॉटेल्सचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच किनारपट्टी भागातील अनेक तारांकित हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आहेत. कळंगुट येथील तारांकित हॉटेलमध्ये रात्रीच्यावेळी जुगार चालविला जातो व पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी पर्यटकांची गर्दी होत असल्याने पोलिसांनी या दिवशी छापा टाकण्यासाठी दिवसभर पाळत ठेवली होती. हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर दोन खोल्या या जुगारासाठी आयोजकांनी घेतल्या होत्या. या खोल्यांमध्ये जुगार खेळणाऱ्यांसाठी खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली होती. एका खोलीत २२ तर दुसऱ्या कोलीत २० जण पर्यटक आयोजकांसह होते.

...आणि डाव फसला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने इतर राज्यांतून पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. गोव्यात जुगार खेळण्यासाठी काहीजण स्वतःची वाहने घेऊन कळंगुट भागात जुगार सुरू असलेल्या हॉटेलमध्ये उतरले होते. शनिवारी जुगार खेळून रविवारी (१३ सप्टेंबर) परतण्याचा त्यांचा बेत होता. या हॉटेलमध्ये शनिवारी (१२ सप्टेंबर) पर्यटकांची सकाळपासूनच गर्दी सुरू झाली होती. त्यामुळे कळंगुट पोलिसांनी या हॉटेलच्या परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात केले होते. या जुगार संध्याकाळी सुरू होण्याच्या पूर्वीच पोलिसांनी हॉटेलचा पूर्ण परिसरात घेरण्यात आला. त्यानंतर थेट जुगार सुरू असलेल्या खोल्यांमध्ये छापा टाकला. तेव्हा अनेकजण जुगार खेळण्यात दंग होते. त्यावेळी अचानक पडलेल्या पोलिस छाप्यामुळे पर्यटकांचे धाबे दणालेले. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व उपअधीक्षक ॲडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली नोलास्को रापोझ यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये निरीक्षक विजयनाथ कवळेकर, उपनिरीक्षक दिनेश गडेकर, विराज नाईक तसेच अन्य पोलिसांचा समावेश होता.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या