‘पीडीए’मध्ये सुमारे ४५० कोटींचा महाघोटाळा 

विलास महाडिक
शनिवार, 11 जुलै 2020

मंत्री लोबो यांना नेहमीच खोटे आरोप करून प्रसिद्ध मिळवण्याची सवय आहे. त्यांनी कळंगुट पीडीए करून मोठे घोटाळे केले आहेत.

पणजी

ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो हे उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एनजीपीडीए) अध्यक्ष असताना बेकायदेशीर सीआरझेड ना हरकत दाखले देऊन सुमारे ४५० कोटींचा महाघोटाळा झाला असल्याचा आरोप पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी करून यासंदर्भातचे पुरावे जमा करून ते केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) चौकशीसाठी सुपूर्द करणार आहे. त्यामुळे चक्रव्यूहात कोण अडकला आहे हे लोकच पाहतील असा टोला त्यांनी हाणला. 
आमदार रोहन खंवटे हे एलपीके हॉटेल तोडफोड प्रकरणात गुंतले असल्याचा गंभीर आरोप मंत्री मायकल लोबो यांनी केला होता त्याला सडतोड उत्तर देताना खंवटे म्हणाले की, मंत्री लोबो यांना नेहमीच खोटे आरोप करून प्रसिद्ध मिळवण्याची सवय आहे. त्यांनी कळंगुट पीडीए करून मोठे घोटाळे केले आहेत. त्यांनी ज्यांच्याकडून सीआरझेड प्रमाणपत्र देण्यासाठी व्यवहार केले आहेत त्याची माहिती हाती लागली आहे तर काही लोकांनी ती आणून दिली आहे. त्यामुळे चक्रव्यूहाची भाषा बोलणारे मंत्री लोबो हे स्वतःच त्यामध्ये अडकणार आहेत. त्यांचे कारनामे या महाघोटाळातून लोकांसमोर येतील. हा घोटाळा विधानसभा अधिवेशनात उघड करायचा होता मात्र अधिवेशन एकदिवशीय आहे त्यामुळे तो कधी मांडता येईल हे माहीत नाही. त्यांनी आरोप करण्याचे थांबवून चक्रव्यूहातून कसे बाहेर पडता येईल याचा मार्ग शोधावा असा सल्ला खंवटे यांनी त्यांना दिला. 
एलपीके हॉटेल तोडफोडप्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले तेव्हा त्यामध्ये आरोप निश्‍चित होण्यापूर्वीच ते निकालात काढण्यात आलेले आहे. त्यामुळे मंत्री लोबो यांनी ज्या प्रकरणावरून आरोप केला आहे तो न्यायालय अवमान आहे. या प्रकरणात माझा संबंध नाही हे मी कोणत्याही देवळात येऊन शपथ घेण्यास तयार आहे, मात्र मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलविणार नाही, मुख्यमंत्री होणार नाही तसेच भाजपमध्येच राहणार व पक्ष सोडणार नसल्याची शपथ घ्यावी. त्याचा अंमलीपदार्थामध्ये, कोरोना, क्वरांटाईन पर्यटन, वेश्‍या व्यवसाय तसेच मटका याच्याशी काहीच संबंध नाही, पीडीएमध्ये
घोटाळा केला नाही, हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास काही व्यवहार केला नाही यासंदर्भातही शपथ घ्यावी, असे आव्हान आमदार खंवटे यांनी त्यांना दिले. 
मंत्री मायकल लोबो यांचे मानसिक संतुलन ढळलेले आहे. ते स्वतः मुख्यमंत्र्यांसारखेच वागत आहेत. त्यांना प्रसिद्धी झोतात राहण्यास ते असे बेजबाबदार आरोप करत आहेत. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर त्यात झालेल्या निर्णयांची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना द्यायची असते मात्र ते हे माहिती देण्यापूर्वीच मंत्री मायकल लोबो स्वतःच सांगून प्रसिद्ध मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून ते प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत अशी टीका आमदार खंवटे यांनी केली. 
पर्वरी मतदारांनी दोनवेळा अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिले आहे. पर्वरीचे मतदार स्वाभिमान, अभिमानी व हुशार आहेत. ते कामे पाहून निवडून देतात. माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आमदार वा मंत्री झालो तरी अजून लोकांबरोबरच आहे. मतदारसंघातील कामे व लोकांच्या समस्यांना अधिक महत्त्व देत आहे. त्यामुळे लोक माझ्याबरोबर आहेत त्यामुळे पुढील निवडणूक लढवून निवडून येण्याचे आव्हान मंत्री लोबो यांनी दिले आहे त्याची आवश्‍यकता नाही असे आमदार खंवटे म्हणाले. 

संबंधित बातम्या