४८० कोटींच्या राष्ट्रीय रस्त्याला ठीक ठिकाणी खड्डे..!

निवृत्ती शिरोडकर
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारच्या निधीतून पत्रादेवी ते करासवाडा पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर ४८० करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. पत्रादेवी ते कोलवाळ पुलापर्यंत या रस्त्याला ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

मोरजी
पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळपर्यंतचा क्रमांक ६६ हा राष्ट्रीय रस्ता पूर्वीपासून वादग्रस्त ठरलेला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर शेकडो लहान-मोठे अपघात झाले असून, किमान डझनभर लोकांना जीव गमवावा लागला आहे. 
केंद्र सरकारच्या निधीतून पत्रादेवी ते करासवाडा पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर ४८० करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. पत्रादेवी ते कोलवाळ पुलापर्यंत या रस्त्याला ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. 
१२ जुलै रोजी पोरस्कडे येथील तेरेखोल नदी शेजारील १०० मीटर लांबीचा रस्ता पाण्यात वाहून गेला. आणखी ४०० मीटर रस्त्याला तडे गेले असून, तोही रस्ता आता ठेकेदाराला परत करावा लागेल. दरम्यान ठेकेदाराचा अजब कारभार जनतेला पहावयास मिळत आहे. कोसळलेल्या परीसरात कोणतीच संरक्षण भिंत न बांधता मातीचा भराव टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 
हा रस्ता करताना आजपर्यंत स्थानिकांना ज्या पंचायत क्षेत्रातून रस्ता गेलेला आहे, त्यांनाही विश्वासात न घेता या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ महाखाजन पर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पहिल्या टप्प्यातील या रस्त्यावर ४८० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी जमीन सरकारने कायदेशीर ताब्यात घेतली नाही किंवा रस्त्यासाठी लागणारी माती लोबर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला असलेले डोंगर बिनधास्त ठेकेदार कापत आहे. नगरनियोजन खात्याचेही याकडे लक्ष नाही. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने एखादे घर किंवा दुकान घालण्यासाठी थोडा डोंगर कापला तर लगेच तालुक्याचे जिल्हाधिकारी, मामलेदार किंवा नगर नियोजन खात्याचे अधिकारी घटनास्थळी जावून कारणे दाखवा नोटीस पाठवून पुढील कार्यवाही करत असतात. मात्र रस्त्यासाठी मोठमोठे बेकायदा डोंगर कापले जातात त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल व्यंकटेश नाईक यांनी उपस्थित केला. रस्त्यासाठी माती आणि लोबर मिळवण्यासाठी रस्त्याच्या ठेकेदाराने डोंगरच गायब केला असून, त्याच्या विरोधात आपण न्याय मागितला असल्याची माहिती ॲड. व्यंकटेश नाईक यांनी दिली. 
सरकारचा आवडता एमव्ही आर कंपनीचा ठेकेदार असल्याने सरकारही ठेकेदाराची मनमानी खपवून घेत आहे. त्यांच्या भोंगळ कारभाराविषयी कुणीही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. 
राष्ट्रीय महामार्गाचे काम करतेवेळी नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत तालुक्याचे आमदार दयानंद सोपटे, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी आतापर्यंत एकदाही संयुक्त बैठक घेतलेली नाही. किंवा स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत. या राष्ट्रीय रस्त्याची स्थिती पाहता पोरस्कडे ते उगवे रेल्वे पुलापर्यंतचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा हा कळस असल्याची प्रतिक्रिया ॲड. जितेंद्र गावकर यांनी दिली. ५०० मीटर लांबीच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आणि रस्ता कोसळला तरीही सरकारचे अजून डोळे उघडलेले नाहीत. सरकार आणखी किती जणांचे बळी घेऊ पाहत आहे, असा सवाल गावकर यांनी उपस्थित केला आहे. 

संरक्षण भिंत नसताना 
टाकला मातीचा भराव
 
एम. व्ही. आर. कंपनीच्या ठेकेदाराने आणखी हलगर्जीपणा करताना जी संरक्षण भिंत तेरेखोल नदीत कोसळली त्या ठिकाणी नवीन भिंत न उभारता परत तशाच मातीचा भराव टाकून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मातीचा जो भराव टाकलेला आहे, तो हळूहळू नदीत जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या