अबब कोलवाळमध्ये तब्बल ५४ भंगारअड्डे!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

यासंदर्भातील वैशिष्ट्य म्हणजे हे भंगारअड्डे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गालगत कोलवाळमधील बिनानी कंपनीचा प्रकल्प ते करासवाडापर्यंत कार्यरत आहेत. या भागाबरोबरच चिखली-कोलवाळ ते पॉवर ग्रीड प्रकल्पाच्या परिसरापर्यंत ते भंगारअड्डे व्यापलेले आहेत. काही भंगारअड्डे थोडेसे अंतर्गत भागातही आहेत.

म्हापसा: कोलवाळ पंचायत क्षेत्रात सध्या एकाच प्रभागात तेसुद्धा कोमुनिदादच्या मालकीच्या जमिनीत तब्बल ५४ लहान मोठे भंगारअड्डे कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी नित्यानंद कांदोळकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ते पद सध्या रिक्त आहे. नवीन सरपंचाची निवड झाल्यानंतर या भंगारअड्ड्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील सोपस्कार होणार आहेत.

यासंदर्भातील वैशिष्ट्य म्हणजे हे भंगारअड्डे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गालगत कोलवाळमधील बिनानी कंपनीचा प्रकल्प ते करासवाडापर्यंत कार्यरत आहेत. या भागाबरोबरच चिखली-कोलवाळ ते पॉवर ग्रीड प्रकल्पाच्या परिसरापर्यंत ते भंगारअड्डे व्यापलेले आहेत. काही भंगारअड्डे थोडेसे अंतर्गत भागातही आहेत.

पंचायत सदस्य बाबनी साळगावकर यासंदर्भात म्हणाले, की या भंगारअड्ड्यांचे मालक मुख्यत्वे परप्रांतीय आहेत. त्यापैकी कुणीही मालक कोलवाळमधील रहिवासी नाही. या यार्डपैकी काही मालकांना कोलवाळ पंचायतीने नोटिसा बजावलेल्या आहेत, काहींच्या विरोधात मामलेदार कार्यालयांत तक्रारी आहेत, तर काही भंगारअड्डे पाडण्यासंदर्भात पंचायत संचालकांनी स्टे ऑर्डर्सही दिलेल्या आहेत.

यापैकी काही भंगारअड्ड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात कोलवाळ पंचायतीने कारवाई सुरू केली असता, पंचायत संचालकांनी त्याबाबत स्थगिती दिल्याने सध्या पंचायतही त्यासंदर्भात काहीच करू शकत नाही. त्यासंदर्भात पंचायत मंडळही हतबल झाले आहे. कारण अशी प्रकरणे न्यायालयात पुढे सुरूच ठेवायची झाल्यास त्यासंदर्भात वकिलाच्या शुल्कापोटी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. पंचायतीच्या विद्यमान आर्थिक परिस्थितीमुळे अशा खटल्यांवर लाखो रुपये खर्च करणे पंचायतीलाही शक्य नसल्याने सध्या कोलवाळ पंचायत मंडळही गप्पच आहे.

कोलवाळमधील भंगारअड्ड्यांसंदर्भात शासकीय यंत्रणा तसेच पंचायत संचालक घेत असलेल्या भूमिकेला कंटाळून आपण कोलवाळ सरपंचपदाचा राजीनामा दिल्याचा दावा नित्यानंद ऊर्फ नितीन कांदोळकर यांनी अलीकडेच केला होता. ते यासंदर्भात म्हणाले, की ‘‘कोलवाळमधील बेकायदा कृत्यांसंदर्भात लोकांच्या मागणीनुसार आम्ही शासकीय दरबारी सातत्याने पाठपुरावा केला; तथापि, त्याबाबत शासकीय यंत्रणेकडून यथोचित सहकार्य मिळाले नाही. उलट, शासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बाबतीत नाउमेद करण्यात आले. सरकारी पातळीवर सरपंचाला काहीच किंमत नाही, असेच त्यामुळे माझी भावना झाली आहे. नामधारी सरपंच म्हणून राहणे मला मान्य नाही. त्यामुळे मी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.’’

कोलवाळमधील भंगारअड्ड्यांचे प्रकरण सध्या निळकंठ हळर्णकर व किरण कांदोळकर या आजी-माजी आमदारांमधील राजकीय द्वंद्वामुळे ऐरणीवर आले आहे. या नऊ-सदस्यीय पंचायत मंडळासाठी विद्यमान कार्यकाळासाठी निवडणूक झाल्यानंतर सर्वप्रथम माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या गटाचे म्हणून मानले जाणारे दशरथ बिचोलकर यांची सरपंचपदी, तर रती वारखंडणकर यांची उपसरपंचपदी निवड झाली होती. काही काळानंतर विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटातील पंचायत सदस्य असल्याचे मानले जाणाऱ्या अजिंक्षा फडते, राधिका बांदेकर व मायकल फर्नांडिस यांनी किरण कांदोळकर यांच्याच गटातील पंचायत सदस्य नित्यानंद कांदोळकर, बाबनी साळगावकर व शीतल चोडणकर यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे दशरथ बिचोलकर व रती वारखणकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव संमत होऊन जानेवारी २०१९ मध्ये नित्यानंद कांदोळकर यांची सरपंचपदी व अजिंक्षा फडते यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटाचे वर्चस्व या पंचायतीवर प्रस्थापित झाले होते.

सध्या कोलवाळ पंचायतीच्या सत्ताधारी गटात उपसरपंच अजिंक्षा फडते, बाबनी साळगावकर, शीतल चोडणकर, मायकल फर्नांडीस व राधिका बांदेकर पाच जणांचा यांचा समावेश आहे, तर विरोधी गटात परेश बिचोलकर, रितेश वारखंडकर व प्रियंका बिचोलकर या तिघांचा समावेश आहे.

पंचायतीचा निधी विनाकारण खर्ची!
पंचायत संचालकांनी काढलेल्या परिपत्रकानुसार कोलवाळ पंचायतीने गावातील बेकायदा भंगार अड्ड्यांविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सरपंचपदाच्या कार्यकाळात हे भंगाडअड्डे हटवणारच, असे आश्वासन सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी कोलवाळवासीयांना ग्रामसभेत दिले होते. परंतु, पंचायत संचालकांनी अप्रत्यक्षपणे स्वत:च्याच आदेशाचे उल्लंघन करून त्या बेकायदा अड्ड्यांच्या मालकांचे हित जपत त्यांच्याविरोधातील कारवाईला स्थगितीही दिली, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे, असे कांदोळकर यांचे म्हणणे आहे.

बेकायदा कृतींच्या विरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करू पाहणाऱ्या कोलवाळ पंचायतीच्या कार्यात पंचायत संचालकांनी अडथळा आणला. सध्या पंचायतीच्या निधीत जमा असलेला सार्वजनिक पैसा त्या बेकायदा भंगार अड्ड्यांसंदर्भातील खटल्यांसाठी विनाकारण खर्च करावा लागत आहे. सरकारी यंत्रणेकडून पंचायतीला सहकार्य मिळत नसल्यानेच असे होत आहे. आम्ही सर्व नऊही पंचायतसदस्य एकसंध असून आम्ही सर्वसंमतीने नवीन सरपंचांची निवड करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोलवाळमधील बेकायदा भंगारअड्डे हटवणारच. - नित्यानंद कांदोळकर, माजी सरपंच, कोलवाळ

आमदार नीळकंठ हळर्णकर हे सुमारे पंचवीस वर्षे कोलवाळ पंचायतीच्या सरपंचपदी होते व प्रामुख्याने त्यांच्याच कारकिर्दीत त्या स्क्रॅप-यार्डना परवाने दिले होते. त्यामुळे, ते स्क्रॅप यार्ड हटवणे सध्या कठीण झाले आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही स्क्रॅप-यार्डच्या विरोधात आंदोलन केले होते तेव्हा आम्हा नऊ जणांना पोलिसांनी अटक केले होते. त्या वेळी बाबनी साळगावकर हेसुद्धा आमच्या समवेत होते. त्या स्क्रॅप-यार्डच्या मालकांना पंचायतीनेच ना हरकत दाखला दिल्याने पंचायतही सध्या त्यांच्या विरोधात काहीच करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. -  रती वारखंडकर, पंच सदस्य, कोलवाळ

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या