गोव्यात शपथविधीवर 5.59 कोटींची उधळपट्टी!

आरटीआय माहितीद्वारे उघड: करदात्यांवर लादला अनाठायी खर्च
गोव्यात शपथविधीवर 5.59 कोटींची उधळपट्टी!
RTIDainik Gomantak

पणजी: मुख्यमंत्री व आठ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर 5.59 कोटी रुपये खर्चाची उधळपट्टी झाल्याची माहिती ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी घेतलेल्या माहिती हक्क कायद्याखाली उघड झाली आहे. यामध्ये स्टेडियमच्या भाडेपट्टीचा तसेच जाहिरातीवरील खर्चाचा समावेश नाही. सरकारने मोठ्या दिमाख्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला होता व त्यावर कोट्यवधींचा खर्च करून करदात्यांवर लादल्याचे मत रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले.

माहिती हक्क कायद्याखाली मागितलेल्या माहितीनुसार, 28 मार्च 2022 रोजी निश्‍चित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्वसाधारण प्रशासनाने माहिती व प्रसिद्धी खात्याला त्याचे आयोजन करण्यास सांगितले होते. मात्र, वेळेच्या अभावामुळे सर्व प्रक्रिया केली तर वेळ लागू शकतो त्यामुळे सरकारी पातळीवरच तो करण्याची सूचना केली. सर्व प्रक्रिया धाब्यावर बसवून हा खर्च करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी वास्को येथील खासगी एजन्सीने यापूर्वीही इतर सरकारी सोहळ्यांचे आयोजन करण्याचे काम केले असल्याने त्यांना मान्यता देण्यात आली.

RTI
'बड्डेतील स्थानिकांचे प्रश्न तातडीने सोडवणार'

शपथविधी सोहळ्यासाठी करण्यात आलेली तयारी तसेच विविध कामांवर झालेल्या खर्चाचे बिल या खासगी एजन्सीने सरकारला 13 एप्रिल 22 रोजी पाठवले. या बिलामध्ये सुमारे 4 कोटी 79 लाख 11 हजार 245 रुपये खर्च दाखवण्यात आला होता. ते त्याच दिवशी सरकारला मिळाले. त्यानंतर या एजन्सीने त्यात बदल करून नव्याने बिल पाठवले. त्यामध्ये 5 कोटी 59 लाख 25 हजार 805 रुपये असे दाखवण्यात आले होते. हे बदलून पाठवण्यात आलेले बिलही त्याच दिवशी पाठवण्यात आलेले आहे व सरकारला 22 एप्रिल 22 रोजी मिळाल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या खासगी एजन्सीने पाठविलेल्या बिलामध्ये 32 विविध कामांचा खर्च दाखवण्यात आला आहे.

त्यामध्ये मोठ्या खर्चामध्ये व्यासपीठ सुशोभिकरण 1 कोटी 87 लाख रु., अति महनीय व्यक्तींसाठी 500 खुर्च्या 3 लाख रु. तर इतर महनीय व्यक्तींसाठी 3500 खुर्च्यांना 8.75 लाख रु., 10 हजार व्यक्तींसाठी भोजन 57.50 लाख रु., 500 जणांना विशेष भोजन 4.8 लाख रु., 75 अति विशेष महनीय व्यक्तींसाठी विशेष बफेट 5.6 लाख रु., सोहळ्यासाठी घालण्यात आलेले दोन आर्कसाठी 16 लाख रु., साऊंड सिस्टीमसाठी 14 लाख रु., तीन रेड कार्पेटस् 8.25 लाख रु., जनतेसाठी उभारण्यात आलेल्या शामियान्यासाठी 19 लाख रु. व विविध महनीय व्यक्तींचे तसेच इतर कटाऊटस् खांब्यावर लावण्यात आले होते त्यावर 68.40 लाख रु. खर्च झाल्याचे या माहितीत उघड झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.