फार्मा कर्मचाऱ्यांकडून ‘प्‍लाझ्मादाना’चा संकल्‍प

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

फार्मा कंपन्यांच्या ५६ कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मादान केले असून आणखी बरेचजण प्लाझ्मादान करण्याच्या तयारीत आहेत.

मडगाव: उपचार घेणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझ्मादान करण्यासाठी वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांचे कर्मचारी पुढे सरसावले आहेत. प्लाझ्माची कमतरता जाणवत असल्याच्या स्थितीत या कर्मचाऱ्यांची ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. 

अबोट, टुलीप डायग्नोस्‍टिक्स, मार्कसॅन्स फार्मा, युनिकेम लॅब, ग्‍लेनमार्क फार्मा व लुपिन या कंपन्यांनी प्लाझ्मादान करण्यात पुढाकार घेतला आहे. या कंपन्यांच्या ५६ कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मादान केले असून आणखी बरेचजण प्लाझ्मादान करण्याच्या तयारीत आहेत. पूर्ण बरे झालेल्या इतर कोविड रुग्णांसाठी त्यांची ही कृती प्रेरणादायी आहे, असे गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनचे (जीएसआयए) अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी सांगितले. 

कोविडचा मुकाबला करण्यासाठी सुरवातीपासून विविध कंपन्यांनी सरकारला सहकार्य केले आहे. परप्रांतीयांना रेशन देणे, मुख्यमंत्री कोविड निधीला योगदान, कोविड योद्ध्यांसाठी सामग्री पुरवणे, कोविड संकटकाळातही त्वरित उद्योग सुरू करणे, शेजारच्या राज्यातून कर्मचाऱ्यांना घेऊन येणे, औद्योगिक वसाहतीत कोविड चाचणी सुविधा सुरू करणे व औद्योगिक वसाहतीतील कर्माचाऱ्यांसाठी १४० खाटांच्या क्षमतेचे कोविड केंद्र सुरू असे वेगवेगळे उपक्रम उद्योगांनी हाती घेतले आणि आता प्लाझ्मादान करण्यातही वेगवेगळे उद्योग योगदान देत आहेत, असे कोचकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या