..आणि उगवला ‘सोन्याचा दिन’ ; थरारानंतर गोवा मुक्तिदिनाची पहाट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

१९ डिसेंबर सकाळी आकाशवाणीवर गोवा स्वातंत्र्य झाल्याचे सांगण्यात आले. गोवा पोर्तुगीजांचा राजवटीतून मुक्त झाला, ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गोव्यात पसरली.

पणजी :  ‘१८ डिसेंबर’ची सायंकाळ, भारतीय सैन्य बेतीपर्यंत येऊन धडकल्‍याची माहिती पणजीत पोहोचली. काही उत्साही नागरीक होडी घेऊन ते सैन्य पाहण्‍यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी ‘१९ डिसेंबर’ला पणजीतील पोर्तुगीज सरकारची कार्यालये ओस पडली. सैन्य दाखल होऊन वास्कोतील वाडे परिसरात असलेल्या पोर्तुगीज तळावर पोर्तुगीजांनी शरणागती पत्रावर सही करत असताना पणजीतील पोर्तुगीज कार्यालयांतील हाताला मिळेल ते घेऊन लोक पळत होते. पोर्तुगीजांवर आम्ही विजय मिळवल्याची निशाणी, मग ती कोणत्याही स्वरूपात असो ती जनतेला हवी होती.

सोनियाचा दिवस आज उगवला,
गोवा मुक्तीचे तोरण सजले,
पोर्तुगीज जोखडातून गोवा मुक्त झाला..!

स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली म्हणाले, त्यावेळी पणजी शहराचा आकार मर्यादित होता. कौलारू घरे होती. १८ डिसेंबरला विमाने घोंगावू लागल्याने पणजीतील बहुतांश नागरीक शेजारील गावांत राहण्यास गेले होते. त्यापैकी अनेकजण घाबरून घराबाहेर पडलेच नाहीत. लढाऊ विमानांतून टाकलेल्या पत्रकांमुळे भारतीय सैन्याने गोवा काबीज केल्याचे अनेकांना समजले होते. मात्र, गोळीबार झाला तर...या शंकेने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले. मी त्यावेळी केप्यात होतो. पणजीत अनेक ठिकाणांहून आलेले लोक व लष्करी जवान यांची गर्दी होती. त्यावेळी काहीसे उत्साहाचे मात्र सावध असे वातावरण पणजीत होते. पोर्तुगीज खरेच गेले याची खात्री जनतेला पटली तेव्हाच सारे रस्त्यावर आले.

 

१८ डिसेंबरला सकाळी ७ वाजले आणि स्‍फोट झाला...

गोवा मुक्तीवेळी १३-१४ वर्षांचे असलेले आश्‍विन लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ डिसेंबरपूर्वी अनेक दिवस आधीपासून गोव्यावर हल्ला होणार, युद्ध होणार अशी चर्चा होती. युद्धाचे वातावरण तयार होत होते. पोर्तुगीज सैनिकांचे येणे-जाणे जास्त होते. संशयित वातावरणात ते वागत होते. रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी खंदक खणलेले होते. म्हापसा, पणजी मार्गावर ठिकठिकाणी टॅंक उद्‌ध्वस्त करणारे बॉंब पेरण्यात आले होते. १८ डिसेंबरच्या पहाटे भारतीय सैन्य गोव्यात घुसल्याची बातमी रेडिओवर सांगण्यात आली. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा.च्या दरम्यान एक मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला नंतर समजले की, भारतीय सैन्याला रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी म्हापसा तार नदीवरील पूल उडवून दिला. लगेच दुसरा स्फोट ऐकू आला. तेव्हा कळले की बस्तोड्याचा छोटा पूल उडवून दिला. नंतर लगेच आकाशात विमाने घिरट्या घालू लागली. मोठमोठ्याने आवाज येत होते, ते काय तरी सांगायचे प्रयत्न करीत होते. म्हापशाला मोठा जमाव जमलेला दृष्टीत पडत होता. नंतर समजले, की हा जमाव म्हापसा पोलिस चौकात जात होता. नंतर त्यांनी पोर्तुगीजांचा झेंडा काढून भारताचा झेंडा लावला होता आणि पोर्तुगीज सैनिक गिरी येथून पणजीला जाणाऱ्या रस्त्यावरून तोफांचा भडिमार करीत होते. भारतीय सैन्य ४ वा.च्या दरम्यान म्हापशाला पोहोचले आणि आमच्या गिरी गावात ५ वाजता सैन्याने प्रवेश केला. मोठमोठ्या रणगाड्यांच्या रांग आमच्या गावच्या रस्त्यावरून येत होती. कारण मुख्य म्हापसा-पणजी रस्त्यावरचे सर्व साकव पोर्तुगिजांनी मोडून टाकले होते. तेव्हा बगल गिरी रस्त्याने सैन्य बेतीला जात होते.

 

१९ रोजी आदिलशहा पॅलेसला वेढा 

म्हापसा-पणजी मार्गावर टॅंक उद्‌ध्वस्त करणारे बॉंब पेरण्यात आले होते. भारतीय सैनिकांनी ते काढून टाकले. काही जीप गाड्या पोर्तुगीजांनी टाकून दिल्या होत्या. रणगाड्यांवर शीख, मराठा सैनिक उभे होते आणि त्याच्यामागे तिरंगा झेंडा होता. १९ डिसेंबर उजाडल्यावर मी रस्त्यावर पाहतो, तर लोक वाहने भरभरून पणजीला निघाले होते. पणजीत भारतीय सैनिकांनी आदिलशहा पॅलेसला वेढा घातला होता. लोक पोर्तुगिजांच्या ऑफिसांमधून मिळेल ती वस्तू घेऊन जाऊ लागले. त्यांना विचारणारा कोणीच नव्हता. भारतीय सैनिक हे सगळे दृश्‍य पाहात होते. पण, त्यांना अटकाव करीत नव्हते.

 

आग्‍वादमधून देशभक्तांना भारतीय सैन्‍याने केले मुक्त

रावणफोंड येथील श्रीनिवास शेणवी कुंदे यांच्या माहितीनुसार, गोवा मुक्‍त होण्याआधी १५ दिवस अगोदर गोव्यामध्ये खूपच तणावाचे वातावरण होते. १८ डिसेंबरला पोर्तुगीजांच्या सैन्याने मडगावामधील झुआरी नदीवरचा बोरी येथील पूल व कुशावती नदीवरील केपे येथील पूल हे दोन्ही पूल बॉम्बस्फोटाद्वारे उद्‌ध्वस्त केले. पोर्तुगीज सैन्याने जेव्हा बोरी व केपे येथील दोन्ही पूल उडवले, तेव्हा झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण गावेच्या गावे हादरली. या बॉम्बस्फोटाला तसेच पोर्तुगीजांच्या इतर भ्याड कृत्यांना न जुमानता भारतीय सैनिकांनी गोव्यामध्ये विविध मार्गांनी प्रवेश केला. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक गोमंतकीय नेत्यांना देशद्रोहाच्या नावाखाली पोर्तुगीजांनी आग्वाद येथील तुरुंगात डांबले होते. त्या सर्व देशभक्तांना भारतीय सैन्याने मुक्त केले.

 

...आणि गोवा मुक्त झाला!

धावे-तार येथील जयसिंगराव राणे यांच्या माहितीनुसार, १८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेची लढाऊ विमाने सर्वत्र फेरफटका मारीत होती. या घटनेमुळे सत्तरीतील लोक भयभीत झाले होते. पण नंतर समजले, की हे आपले सैनिक आहेत. सैनिकांनी विमानातून सर्वत्र मराठीतून पत्रके फेकली व या पत्रकांवर लिहिले होते, ‘घाबरू नका, आम्ही आलो आहोत, भीती नाही’, ती पत्रके वाचल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले व लोकांनी भारतीय सैनिकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. १९ डिसेंबर सकाळी आकाशवाणीवर गोवा स्वातंत्र्य झाल्याचे सांगण्यात आले. गोवा पोर्तुगीजांचा राजवटीतून मुक्त झाला, ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गोव्यात पसरली. संपूर्ण गोव्यात एकच जल्लोषाचे वातावरण पसरले. लोक रस्त्यावर येऊन आनंदाने नाचू लागले. घराघरांतून विजयाची तोरणे लावली गेली. रस्त्यावर व घरांमध्ये गुढ्या उभारल्या गेल्या. सर्व एकमेकांना मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त करू लागले. भारतीय सैन्याचे गोमंतकीय जनतेने स्वागत केले. सुवासिनींनी त्यांना विजयाचा कुंकुमतिलक लावून पंचारतीने ओवाळले. 

 

 

संबंधित बातम्या