मुरगाव तालुक्यात कोरोनाचे ६२७ रुग्ण

Baburao Rivankar
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

वास्कोत लॉकडाऊनची मागणी फेटाळल्याने वास्कोतून राज्यभर कोरोरोना विषाणू पसरण्यास कारणीभूत ठरला असून एकट्या मुरगाव तालुक्यात गुरुवारपर्यंत ६२७ रुग्ण वास्को आणि कुठ्ठाळी आरोग्य केंद्रात नोंद झालेले आहेत.

मुरगाव
मुरगाव तालुका कोरोनासाठी हॉटस्पॉट गेल्या दोन महिन्यांपासून ठरलेला आहे. अजूनही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने काही परिसर कंटेनमेंट झोन केले होते, पण यामुळे संसर्ग रोखण्याऐवजी वाढत गेला. परिणामी आतापर्यंत राज्यातील सर्व तालुक्यांपैकी मुरगाव तालुक्यात सर्वाधिक ६२७ रुग्णांची नोंद आहे. तसेच मृत्यूंची संख्याही सर्वाधिक आहे.
दरम्यान, वास्को आरोग्य केंद्रात दरदिवशी नोंद होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मुरगाव पालिकेला सादर केली जात नसल्याने योग्य पावले उचलण्यास आडकाठी येते, असे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले. पालिका संचालनालयाने दैनंदिन आकडेवारी सखोल माहितीसह देण्याचे आदेश दिले आहेत, पण आरोग्य विभागाकडून अशी माहिती पुरवली जात नाही, असे श्री. राऊत म्हणाले.
पालिकेच्या तांत्रिक विभागाने माहिती मिळविण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले नोडल ऑफिसर मुरगावचे संयुक्त मामलेदार कृष्णा गावस यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मुरगाव पालिकेची गोची झाली आहे. या कारणांमुळे पालिका संचालकांना मुरगाव पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची सखोल आकडेवारी देणे शक्य होत नाही, अशी माहिती मिळाली आहे.
आरोग्य खात्याने आपले दैनंदिन कोविड-१९ बुलेटिन आरोग्य केंद्र निहाय नुसार प्रसारीत करण्यास सुरवात केल्याने कोणत्या भागातील रुग्ण आढळले याची माहिती मिळत नाही. यापूर्वी कोणत्या गावात किती रुग्ण आढळले याची सविस्तर माहिती देऊन बुलेटिन प्रसारीत केले जायचे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या