तेजपाल प्रकरणात सरकारकडुन 66 पानी दुरूस्ती अहवाल; निर्दोषत्व निवाड्यात अनेक त्रुटी

तेजपाल प्रकरणात सरकारकडुन 66 पानी दुरूस्ती अहवाल; निर्दोषत्व निवाड्यात अनेक त्रुटी
Tarun Tejpal.jpg

पणजी: सहकारी महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक अत्याचार (Harassment) प्रकरणीच्या आरोपातून तेहलकाचे (Tehelka) माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याला निर्दोष मुक्त करताना न्यायालयाने निवाड्यात पीडित तरुणीच्या वर्तणुकीवर उपस्थित केलेले मुद्दे, तसेच तिच्या मागील पार्श्‍वभूमीवर ठपका ठेवताना काढलेल्या निष्कर्षात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या खटल्यावर पुन्हा सुनावणी घेण्याची विनंती सरकारने (Goa Government) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (Goa Bench of Mumbai High Court) आव्हान याचिकेत केली आहे.  यामध्ये दुरुस्ती करताना ६६ पानी अहवालात ८४ मुद्दे सादर केले आहेत. (66 page amendment report from Goa government in Tejpal case)

म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल याला पुराव्याअभावी निर्दोष ठरविल्यानंतर, लगेच राज्य सरकारने त्याविरुद्ध आव्हान याचिका खंडपीठात सादर केली होती. गेल्या आठवड्यात ती प्राथमिक सुनावणीसाठी आली असता निवाड्यात पीडित महिलेची ओळख उघड करण्यात आल्याचा मुद्दा सरकारने निदर्शनास आणून दिल्यानंतर तो संदर्भ काढून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.

सरकारनेही आव्हान याचिकेत दुरुस्तीसाठी मागितलेली विनंती खंडपीठाने मान्य केली होती. या याचिकेवर उद्या बुधवारी, २ जूनला सुनावणी होणार आहे. तेजपाल याला निर्दोष ठरविणाऱ्या निवाड्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. घटनेनंतर तेजपाल याने पीडित तरुणीला ई-मेल पाठवून त्वरित दिलगिरी व्यक्त केली होती. त्याने ही दिलगिरी कशाबाबत व्यक्त केली याचा उल्लेख त्यात नसला तरी त्यातून जो अर्थ निघतो तो तेजपाल याच्याविरुद्धचा ठोस पुरावा ठरू शकतो. मात्र त्याकडे न्यायालयाने तांत्रिक कारणावरून दुर्लक्ष केले आहे व तो विचारात घेतला नाहीत, असे या दुरुस्ती अर्जात म्हटले आहे. 

गोवा सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल ॲड. तुषार मेहता व ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हे गोवा खंडपीठात बाजू मांडत आहेत. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने अंतर्गत तक्रार निवारण समिती नेमून केलेल्या आरोपांबाबत चौकशी केली असती तर तो निष्कलंक असल्याचे गृहित धरण्यास संधी होती. मात्र झालेल्या घटनेबाबत पीडित तरुणीला शोमा चौधरीमार्फत ई-मेल पाठवून लाज वाटत असल्याचे नमूद केले होते. यावरूनच सर्व काही अप्रत्यक्षपणे सिद्ध होते व आणखी वेगळे काही सांगण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे खटल्यात दिलेल्या निवाड्यात चुका केल्या आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com