६९ गावांना जैव संवेदनशीलतेतून तूर्त मुभा

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

गोवा, कर्नाटक आणि केरळमधील सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावे जैव संवेदनशील म्हणून घोषित करावीत अशी केंद्रीय मंत्रालयाचीच सूचना आहे. राज्य सरकारने याआधी १९ गावांची नावे यासाठी सुचवली होती मात्र 99 गावे जैव संवेदनशील घोषित करण्याजोगी असताना केवळ १९ गावेच का अशी विचारणा मंत्रालयाने राज्य सरकारकडे केली होती.

अवित बगळे

पणजी

राज्यातील ६९ गावे जैव संवेदनशील जाहीर होणे लांबणीवर पडले आहे. ही सर्व गावे अभयारण्य क्षेत्रात असल्याने या गावांबाबत फेरविचार करण्याचा विचार सुरु झाला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याने या संदर्भात माहिती पाठवावी, कोविड महामारीचे संकट टळल्यानंतर याविषयी दिल्लीत बैठक घेत अंतिम निर्णय घेऊ असे नमूद केले आहे. त्यामुळे तूर्त ही गावे जैव संवेदनशील जाहीर होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
जावडेकर यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमीळनाडू आणि गुजरातच्या वनमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. प्रत्येक राज्याने जैव संवेदनशील वर्गातून आपली गावे वगळण्यासाठी निवेदने केली आहेत. याबाबतच्या निकषात ही गावे बसत नाहीत असे त्या राज्यांचे म्हणणे आहे. आजच्या बैठकीत प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधीला बाजू मांडण्याची संधी जावडेकर यांनी दिली. गोव्याच्यावतीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले,की कोणती गावे जैव संवेदनशील होणार नाहीत त्याबाबत तपशीलाने केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाला माहिती देण्‍यात येईल. यानंतर जावडेकर यांनी कोरोना महामारी संपल्यानंतर एकेका राज्यासोबत बैठक घेऊन अंतिम अधिसूचना निश्चित करू असे नमूद केले.
याविषयी केंद्र सरकारला राष्ट्रीय हरीत लवादात माहिती द्यायची आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यांचे म्हणणे जावडेकर यांनी जाणून घेतले आहे. त्या माहितीवर आधारीत प्रतिज्ञापत्र केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय राष्ट्रीय हरीत लवादासमोर सादर करणार आहे. लवादाने फेब्रुवारीत ही गावे जैव संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत केंद्र सरकार आता वाढवून मागणार आहे.
गोवा, कर्नाटक आणि केरळमधील सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावे जैव संवेदनशील म्हणून घोषित करावीत अशी केंद्रीय मंत्रालयाचीच सूचना आहे. राज्य सरकारने याआधी १९ गावांची नावे यासाठी सुचवली होती मात्र 99 गावे जैव संवेदनशील घोषित करण्याजोगी असताना केवळ १९ गावेच का अशी विचारणा मंत्रालयाने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर ६९ गावांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 

जैव संवेदनशील गावे
सरकारने जैव संवेदनशील म्हणून घोषित करण्यासाठी सुचवलेली गावे अशी सत्तरी तालुका - डोंगुर्ली, हिवरे बुद्रूक, हिवरे खुर्द, सुरुंगुली, शिरसोडे, गोळावली, ब्रम्हाकरमळी, कोदाळ, सुर्ला, नानोडा, शिंगणे, केळावडे, करंझोळ, पाली, झर्मे, दाबे भाग एक, दाबे भागदोन, साट्रे, देरोडे, वायंगिणी, चरावणे, गवाणे, कोपार्डे, असोडे, नानेली, कोदाळ आणि शेळप बुद्रूक. सांगे तालुका - भोम, काले, डोंगुर्ली, दुधाळ, ओक्‍शेल, मावळींगे, उगे, पाटये, तोडूव, पोट्रे, बाती, कुंबारी, डोंगोर,  नायकिणी, शिंगणे, पोर्टे, नेत्रावळी, वेर्ले, नंद्रे, साळावली आणि विलेना. केपे तालुका- मंगल. धारबांदोडा तालुका- आग्लोटे, कुळे, मोले, सुर्ल, शिगाव, सोनावली आणि कार्मोणे, धारबांदोडा. फोंडा तालुका-गांजे आणि उसगाव. काणकोण तालुका- खोतीगाव आणि पैंगीण.
 

संबंधित बातम्या