६९० जणांची कोविड चाचणी नेगेटिव्ह 

विलास महाडिक
बुधवार, 15 जुलै 2020

कारागृहातील तुरुंग अधिकारी व रक्षक, सुरक्षा रक्षक असलेले आयआरबीचे पोलिस, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्ष,  गृहरक्षक तसेच कारागृहातील पुरुष व महिला कैद्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. पहिल्या दिवशी ४५ कारागृह कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती.

पणजी

कोलवाळ येथील कारागृहात तसेच पोलिस स्थानकात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आल्याने सुमारे ६९० जणांची कोविड चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. त्यामध्ये कारागृहातील ६१९ जणांचा तर पोलिसांमधील ७१ जणांचा समावेश आहे. कोविड नेगेटिव्ह चाचणी आल्याने कारागृह व पोलिस कर्मचाऱ्यांचे भीतीचे सावट दूर झाले आहे. 
गेल्या आठवड्यात कारागृहात वास्को येथील एक तुरुंगरक्षक कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमुळे कारागृहातील तुरुंग अधिकारी व रक्षक, सुरक्षा रक्षक असलेले आयआरबीचे पोलिस, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्ष,  गृहरक्षक तसेच कारागृहातील पुरुष व महिला कैद्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. पहिल्या दिवशी ४५ कारागृह कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. मात्र या चाचणीसाठी वेळ लागत असल्याने म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाचे आरोग्य पथकच कारागृहात दाखल करण्यात आले व त्या ठिकाणी सर्वांची कोविड चाचणी करण्यात आली होती. कारागृहात कैदी असल्याने व त्याचा फैलाव होऊ नये यासाठी या चाचणीचा अहवाल प्राधान्यक्रमाने लवकर देण्याची विनंती कारागृहाच्या संचालकांनी केली होती.
दरम्यान, पणजी पोलिस स्थानक असलेल्या इमारतीतील पोलिस खात्याच्या बिनतारी संदेश विभाग, वाहतूक पोलिस विभागामध्ये नवे  वाडे - वास्को येथील पोलिस खात्यातील एक सफाई महिला कामगारने सफाईचे काम केले होते. ही महिला कोरोना बाधित सापडल्याने
पोलिस खात्याच्या या तिन्ही विभागामध्ये धावपळ उडाली होती. या महिलेने ३ जुलैला सफाई काम केले होते त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. अहवाल येईपर्यंत काहींना मिरामार येथील रेसिडन्सीमध्ये विलगीकरण करण्यात आले होते तर काहींनी स्वतःला घरातच विलगीकरण करून घेतले होते. आज संध्याकाळी या सर्वांच्या कोविड चाचणी नेगेटिव्ह आल्याने या सर्वांनी सुस्कारा सोडला. विलगीकरणात असलेल्या सर्वांना ड्युटीवर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

संबंधित बातम्या