गोव्यातील 70 टक्के उद्योग चालतात सुरक्षा मान्यताविनाच

कारखाने आणि बाष्पक संचालनालयाच्या मुख्य निरीक्षक विवेक मराठे यांची माहिती
गोव्यातील 70 टक्के उद्योग चालतात सुरक्षा मान्यताविनाच
Vivek Marathe Dainik Gomantak

पणजी: राज्यातील 70 टक्के उद्योगांनी कारखाने आणि बाष्पक संचालनालयाची सुरक्षा मान्यता घेतलेली नाही. अनेक कारखाने किमान सुरक्षा उपाय योजण्याबाबत बेफिकीर असतात. अशा कारखान्यांची यादी मी उद्योग सचिवांना सादर केली आहे, अशी माहिती कारखाने आणि बाष्पक संचालनालयाचे मुख्य निरीक्षक विवेक मराठे यांनी आज ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. (70 per cent of Goa's industries operate without safety related permissions)

Vivek Marathe
प्रत्येक खात्याने 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा : मुख्यमंत्री

झुआरी कंपनीत स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे राज्यातील उद्योग व्यवसायात खळबळ उडाली आहे. उद्योग क्षेत्रातील सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर विवेक मराठे दिलेली माहिती अधिकच धक्कादायक आहे. मराठे म्हणाले, उद्योगांना नोंदणी आणि सुरक्षेचे उपाय याबाबत अनास्था आहे. या उद्योगांनी सुरक्षा अधिकारी नेमले पाहिजेत. त्यांनी दरवर्षी ऑडिट अहवाल तयार करायला हवा आणि तो कारखाने आणि बाष्पक संचालनालयाला सादर करायला हवा. दुर्दैवाने या संचालनालयाला पुरेसे अधिकार नाहीत. जर एखाद्या कारखान्यात सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाला तर तो कारखाना बंद करण्याचा अधिकारही या संचालनालयाला नाही. त्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागते. राज्यात अशा बऱ्याच रासायनिक कंपन्या आणि कारखाने आहेत, ज्यांना आम्ही वेळोवेळी भेटी द्यायचो. या कारखान्यांमध्ये काय चालले याची पाहणी करायचो. आता मात्र हे सर्व ऑनलाईन पद्धतीने चालते. त्यामुळे कारखान्यामधील सत्यस्थिती आमच्या नजरेस पडत नाही. बरेच कारखाने हे नियमही पाळत नाहीत. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, असेही मत मराठे यांनी व्यक्त केले.

नट सैल करण्यासाठी चढले अन...

झुआरीनगर येथील ॲग्रो केमिकल लिमिटेड या कंपनीतील वाफेच्या टाकीची दुरुस्ती करायले तीन कामगार चढले होते. टाकीवरील जे नट आहेत ते सैल त्यांना करायचे होते. एक नट न सुटल्याने कामगारांनी गॅस कटर आणला. गॅस कटर सुरू करताच टाकीतील जो काही गॅस होता, तो बाहेर आला आणि स्फोट झाला. खरे तर या टाकीत गॅस किती होता? यावेळी सुरक्षा अधिकारी तेथे असायला हवा, तो तिथे होता का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या घटनेबाबत मला तरी असे वाटते की, कारखान्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे. तसे झाले असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मराठे यांनी सांगितले.

Vivek Marathe
दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देणार: सुभाष फळदेसाई

कारखान्यांनी नियम पाळावेत

विवेक मराठे यांनी ॲग्रो केमिकल लिमिटेड या कंपनीला भेट दिलीआणि त्यांनी या दुर्घटनेची प्राथमिक माहिती जाणून घेतली. कारखान्यामध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना होत्या का? याचाही त्यांनी अभ्यास केला. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी कारखान्यांनी संपूर्ण नियम पाळावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

सुरक्षा अधिकारी असता तर...

या टाकीमध्ये वायू असण्याची शक्यता असल्याने गॅस कटर वापरणे चुकीचे होते. कंपनीचा सुरक्षा अधिकारी तेथे उपस्थित असता तर त्याने कामगारांना गॅस कटर वापरण्यापासून रोखले असते आणि ही दुर्घटना टळली असती, असेही बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.