नऊ कोरोनाबाधित निगेटिव्‍ह

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020


डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांना यश; एकूण रुग्‍णसंख्‍या ३८ : आरोग्‍य सचिवांची माहिती

पणजी

मुंबई येथून रस्ता मार्गे स्वतंत्रपणे आलेली महिला व पुरुष अशा दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज आढळले. त्यांना उपचारासाठी मडगावच्या ‘कोविड’ इस्पितळात हलवण्यात आले आहे. सुरवातीला सापडलेल्या ९ कोरोनाबाधित रुग्णांना तपासले असता आज त्यांची चाचणी नकारात्मक आल्याने त्‍यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ७ दिवसांसाठी हलवण्यात आले. तेथून नंतर ७ दिवसांच्या गृह अलगीकरणासाठी त्यांना घरी जाऊ दिले जाणार आहे. आता राज्यात ३८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आरोग्‍य सचिवांनी पुढे सांगितले की, आणखी तीन जणांची पहिली चाचणी सकारात्मक (पॉझटिव्ह) आली आहे. त्यांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल अद्याप यायचा आहे. काही खासगी प्रयोगशाळांनी कोविड चाचणीसाठी नमुने स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी अर्ज केल्यावर त्यांचा विचार सरकार करणार आहे. आज ५०३ नमुने चाचणीसाठी पाठवले, आज ५१५ नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. अद्याप २७ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सध्या संस्थात्मक अलगीकरणात ८७३ असून त्यात ५७३ दर्यावर्दींचा समावेश आहे. सापडलेले रुग्‍ण आणि संशयित राज्‍याबाहेरून आलेले आहेत.
मुखावरणे न वापरल्याप्रकरणी ५३८ जणांवर कारवाई करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ८९ जणांवर कारवाई केली आहे. टाळेबंदीनंतर आजवर जमावबंदी व टाळेबंदी निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ४०४ जणांना अटक केली असून ७७० गुन्हे नोंदवले आहेत. ४८६ वाहनेही जप्त केली आहेत.

तीन रेल्‍वे गाड्यांतून
४ हजार ८६ जण रवाना

महसूल सचिव संजयकुमार यांनी सांगितले की, आज उत्तरप्रदेशसाठी सहा रेल्वे सोडण्यात आल्या. काल मोठ्या संख्येने उत्तरप्रदेशात जाण्यासाठी लोक बाहेर आले होते. प्रत्येकाला आपणच प्रथम रेल्वेतून जावे असे वाटत आहे. आज तीन रेल्वेतून ४ हजार ८६ जण रवाना झाले आहेत. उद्याही आणखी रेल्वेची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर ४३ हजार ७९४ जण राज्याबाहेर गेले आहेत, तर ४ हजार ७५ जण राज्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे जी कागदपत्रे ई पास घेण्यासाठी आवश्यक असतात, ती घेतली जातात. पण, विमान आणि रेल्वेतून गोव्यात येणाऱ्यांना कारण विचारण्याची तरतूद नसल्याने ते विचारले जात नाही.

दर्यावर्दी, संशोधक आज पोहोचणार
दक्षिण आफ्रिकेत अडकलेले ५७ दर्यावर्दी विमानाने मुंबईत पोहोचले आहेत. त्यांना आणण्यासाठी मुंबईला बस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची सोय त्यांच्या कंपन्यांनी केल्याची माहिती देऊन त्यांनी सांगितले की, यात अंटार्क्टिकावर संशोधन करणाऱ्या १२ संशोधकांचाही समावेश आहे. आज रात्री ते गोव्यात दाखल होणार आहेत. आजवर १८ रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत. तीन विमाने आली आहेत. रेल्वेतून आजवर ७७७ प्रवासी गोव्यात उतरले, तर १ हजार ८९३ जण गोव्यातून गेले असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. ‘कोविड’ राज्य निधीत ९ कोटी रुपये जमा झाले असून आजवर ४ कोटी रुपये मुख्यत्वे करून कदंब बसभाडे व किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरण यावर खर्च केल्याची माहिती त्यांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यावर दिली.

संबंधित बातम्या