आम आदमी पक्षाने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना दिला पाठिंबा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

आम आदमी पक्षाने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना पाठिंबा दर्शविला.

पणजी: आम आदमी पक्षाने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना पाठिंबा दर्शविला. भाजपच्या राज्य सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या नोकऱ्या व सुविधांची आश्वासने न पाळायला सुरुवात केल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक सुरेश पारोडकर आणि  नागेश चारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याठिकाणी आपच्या प्रतिनिधी मंडळाने भेट दिली.

आपचे नेते वाल्मीकि नाईक यांनी अशी व्यथा व्यक्त केली की, परकीय राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इतके काही त्यागूनही आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना पुन्हा जीव धोक्यात घालण्यास भाग पाडले गेले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर १० हजार सरकारी नोकऱ्यांची भव्य घोषणा केल्याबद्दल नाईक यांनी टीका केली. २०१३ मध्ये भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना यापैकी फक्त १०० नोकऱ्या देखील देण्याची तसदी ते घेत नाहीत,असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या मुलांनी स्वातंत्र्यानंतर बरीच दशके वाट पाहिल्यानंतरही त्यांचा निषेध सुरूच असल्याचे म्हणत नाईक यांनी सरकारवर टीका केली. नाईक म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना फक्त मुक्ती दिनाच्या नावावर कर्ज स्वरुपात घेतलेले शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आणि स्वत: ची पदोन्नती करण्यात रस आहे, परंतु जे लोक परकिय राजवटी पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळावे,यासाठी त्यांच्या कुटुंबाचे कल्याण आणि मुलांच्या भवितव्याचे बलिदान देतात, त्यांच्या दुर्दशा कमी करण्यास सावंत यांना कमी रस नाही. 

स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वातंत्र सेनानींना आझाद मैदान येथे भेट द्यावी अशी मागणी नाईक यांनी केली, अन्यथा ८०-८५ वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक जे आमरण उपोषणावर आहेत,त्यांची प्रकृती खालावल्यास यासाठी वैयक्तिकरित्या सावंत जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला.

संबंधित बातम्या