कोरोना काळात अर्थिक अडचणीत सापडलेल्या गोमंतकीयांसाठी ‘आप’ची मदत मोहीम

कोरोना काळात अर्थिक अडचणीत सापडलेल्या गोमंतकीयांसाठी ‘आप’ची मदत मोहीम
free ration.jpg

पणजी: कोविड महामारीच्या (Covid-19 Pandemic) काळात संचारबंदीमुळे (Curfew) घरीच अडकून पडलेल्या, उत्पन्नाचे स्त्रोत घटलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत (Help) करण्यासाठी आम आदमी पक्षाने (AAP) मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक घरात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा करण्यासाठी तालुकावार वाहनांची सोय पक्षाने केली आहे. पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी या मोहिमेची सुरवात आज येथे केली. (Aam Aadmi Party has launched a free ration campaign in Goa for those who have lost their means of income)

राज्यातील प्रत्येक घरात मोफत जीवनावश्यक वस्तूंचे (रेशन पॅकेटचे) वितरण करण्याचे लक्ष्य घेऊन आम आदमी पक्षाने आज मोठ्या प्रमाणात कोविड मदत अभियान सुरू केले. कोविड, टाळेबंदी आणि आर्थिक मंदी अशा अनेक संकटांमुळे गोमंतकीय कुटुंबांना मोठा त्रास झाला आहे, असे सांगत राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पक्षाने सामान्य जनतेला आर्थिक मदत मिळावी म्हणून अनेकदा आवाहन केले, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष  केल्याने पक्षाने हे अभूतपूर्व पाऊल उचलले.

मोहिमेच्या प्रमाणामुळे आणि जटिलतेमुळे आज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तीन मतदारसंघात पथदर्शी मोहीम राबविण्यात आली. एकूण ४० व्हॅन यासाठी सेवेत आहेत आणि 1 हजारहून अधिक कार्यकर्ते ग्राम प्रधान यांच्या समन्वयाने घरोघरी रेशन पुरवत आहेत. प्रत्येक पॅकमध्ये पीठ, कडधान्य, साखर, मीठ इत्यादी सारखा सुमारे १० किलोचा कोरडा किराणा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

म्हांबरे यांनी आज पहिल्या 20 वाहनांना पणजीतील पक्षाच्या कार्यालयातून हिरवा झेंडा दाखविला,यावेळी त्यांच्यासह अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, अ‍ॅड. सुरेल तिळवे, कॅप्टन वेंझी व्हिएगश, शुभम शिवलकर, वाल्मिकी नाईक, मॅनुएल कार्दोज, संदेश तेलेकर, श्रीपाद पेडणेकर आदी उपस्थित होते.

वंचितांसाठी घरोघरी मदत

आपचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास यांनी माहिती दिली की, ज्या कुणाला राज्यात मोफत जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत त्यांनी केवळ 7504750475 या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्याच्यापर्यंत ही मदत पोचवली जाईल. या जीवनावश्यक वस्तू वितरण लाभातून कोणीही वंचित राहू नये यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जावून ही मदत पोचवणार आहेत.

आम्ही भाजप सरकारला अनेक वेळा सामान्य जनतेला आर्थिक दिलासा द्यावा, असे आवाहन केले. पण ते कर्णबधिरांच्या कानावर पडले आहे. सरकारने गोमंतकीयांची दुर्दशा समजून घ्यावी. जनता फारकाळ मदतीची वाट पाहत राहू शकत नाही. सरकार जे करू शकले नाही ते आता ‘आप’ करत आहे असे मत आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी  व्यक्त केले आहे. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com