भाजप सरकारमध्ये हिंमत असेल, तर वाळपईतील सभा बंद करून दाखवा: आमदार राघव चढ्ढा यांचे आव्हान

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 

वीज आंदोलनाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने ‘आप’ नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पणजी: जिल्हा पंचायत आचारसंहिता संपल्यानंतर पुढील वर्षी जानेवारीत वाळपईमध्ये वीज आंदोलन सभा मी घेईन तेव्हा भाजप सरकारमध्ये हिंमत असेल, तर ती बंद करून किंवा मला अटक करून दाखवण्याचे आव्हान आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. वीज आंदोलनाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने ‘आप’ नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

गेल्या १ डिसेंबरपासून ‘आप’ने राज्यभर वीज आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून वाळपई येथे आंदोलनावेळी संदेश तेळेकर या आपच्या नेत्याला बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली व हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तेथील ध्वनिक्षेपक व स्पीकर बंद करण्यास लावले व जमलेल्या लोकांना हुसकावून लावण्यात आले. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. ‘आप’ने गोमंतकियांमध्ये कशा प्रकारे वीज बिलांवरून लुटले जात आहे याचा पर्दाफाश केल्याने भाजप सरकार घाबरले आहे व सैरभैर झाले आहे. यावरून हे सरकार कोणत्या थराला गेले आहे याचा अंदाज येतो. केंद्रातील भाजप सरकारनेही अशाच प्रकारे दिल्लीतील आप नेत्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला आपचे नेते घाबरले नाहीत. गोव्यातही आपचे नेते या भाजप सरकारच्या दडपशाहीला व पोलिसांना पाठवून अटक केली तरी घाबरणारे नाहीत, असा इशारा चढ्ढा यांनी दिला. 

भाजप सरकारने ‘आप’ला काँग्रेस समजू नये तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसचे राहुल गांधी समजू नये. आप नेते हे कोणाला घाबरणारे नाहीत. काँग्रेस ‘आप’ला भाजपची बी टीम तर भाजप ‘आप’ला काँग्रेसची बी टीम असे आरोप करत आहे त्यावर एकेदिवशी काँग्रेस व भाजपला थेट चर्चेसाठी आव्हान दिले जाईल. काँग्रेस व भाजप हे ऐकमकाशी जोडलेले आहेत. त्यामुळेच काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे व खेळीमेळीने सरकार चालवत आहेत. गोव्यातील लोक त्यांना येणाऱ्या भरमसाट विज बिले याबाबत वैतागलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात अनेजणांना व्यवसाय घेला आहे. गोव्यात वीज वापरली नाही तरी ग्राहकाला बिल दिले जाते तर दिल्लीत २०० युनिटस् वीज वापरली तरी शून्य बिल येते हाच दिल्ली व गोवा वीज मॉडेलमध्ये फरक आहे. 

‘वीजमंत्र्यांच्या मतदारसंघातच खंडित वीज’
वीजमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘आप’ची वीज आंदोलन बैठक सुरू असताना तीनवेळा वीजपुरवठा खंडित झाला. यावरून वीजमंत्र्यांच्या मतदारसंघातच विजेचा हा लपंडाव, तर ते राज्यातील इतर भागामध्ये सुरळीत वीजपुरवठा काय देणार असा प्रश्‍न दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी केला. ‘आप’ने वीज आंदोलनासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकवर सुमारे २ लाख ६२ हजार ४९६ जणांनी ‘मिस कॉल’ द्वारे नोंदणी, ‘आयव्हीआर’मार्फत व अर्ज भरून पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा:

गोव्यातील विरोधी पक्षांचा आजच्या भारत बंदला पाठिंबा ; सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन करणार -

 

संबंधित बातम्या