सरकारच्या ‘कोविड’ व्यवस्थापनावर आम आदमी पक्षाचा आक्षेप..!

अवित बगळी
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

राज्यात ‘कोविड’ चाचणी घेण्याची जटिल प्रक्रिया तसेच सकारात्मक चाचणी घेतल्यानंतर पुढे काय होईल याची भीती तसेच वेळेवर चाचणी घेण्यापासून लोकांना परावृत्त करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

पणजी
राज्यात ‘कोविड’ चाचणी घेण्याची जटिल प्रक्रिया तसेच सकारात्मक चाचणी घेतल्यानंतर पुढे काय होईल याची भीती तसेच वेळेवर चाचणी घेण्यापासून लोकांना परावृत्त करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. हेल्पलाईन १०४ किंवा चाचणी केंद्रांसाठी सूचिबद्ध दूरध्वनी क्रमांक योग्यरित्या कार्यरत नसल्याचा दावा करत आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी कोविड व्यवस्थापनाचे पहिलेच चरण म्हणजेच ‘चाचणी’ याच चरणात अयशस्वी झाल्याचा आरोप सरकारवर केला. 
चाचणी केंद्रावर लांबच लांब रांगा, सामाजिक अंतराचा अभाव आणि चाचणी केंद्रांवरील हेणा-या उशीराकडे लक्ष वेधत त्यांनी मागणी केली आहे, की सरकारने कोवीड संशयितांना चाचणी केंद्रावर सहज प्रवेश मिळायला हवा. कोविड संशयितांसाठी चाचणी प्रकीया वेदनामुक्त बनवून चाचणी घेण्यास प्रोत्साहित करावे. दिल्लीत एखाद्याच्या गाडीतून बाहेर न पडता घशातील स्त्रावाचा नमुना घेण्याची सोय आहे तसेच सकारात्मक चाचणी आलेल्या रूग्णाना त्वरित समुपदेशन व पूर्ण सहकार्य दिले जाते, त्याचे अनुकरण गोव्यात करावे. 
ज्या कुटूंबातील सदस्याची यापूर्वी सकारात्मक चाचणी घेण्यात आली होती त्या कुटुंबाची दुर्दशा सांगताना राज्य संयोजक एल्विस गोम्स म्हणाले की,त्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांना चाचणी करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. प्रथम बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर मडगाव येथे धाव घेण्यात आली. तरीही अद्याप त्यांची चाचणी करण्यात आली नाही. सरकारच्या या कारभारामुळे सर्वात जास्त नुकसान गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना होत आहे कारण त्यांना योग्य माहिती दिली जात नाही किंवा योग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत. 
गोम्स यांनी कोविड इस्पितळात अचानक बदल घडवून आणल्याबद्दल सरकारवर टीका केली. वाढत्या घटना आणि मृत्यूंकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी व सरकारचे अपयश डॉक्टरांवर ढकलत असल्याचे ते म्हणाले. एप्रिल महिन्यात आझिलो रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर म्हणून काही तास मुख्यमंत्र्यांनी रूग्णांना तपासले होते, त्यांनी आता कोविड इस्पितळात ‘कोविड’ उपचाराच्या ठिकाणी जाऊन सर्वांसमोर उदाहरण निर्माण करावे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या