आम आदमी पक्षाकडून सरदेसाईंची चाचपणी

अवित बगळे
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

आम आदमी पक्षात सध्या धुसफूस सुरु आहे. मध्यंतरी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांशी संवाद साधायचे ठरवले होते. तसे निरोप उमेदवारांपर्यंत पोचवण्यात आले होते. मात्र २१ पैकी ९ जणांनीच या ऑनलाईन केजरीवाल संवादाला हजेरी लावली. यावरून आम आदमी पक्षातील नाराजी किती तीव्र आहे हे लक्षात येते. संजोयकपदावरून एल्विस गोम्स यांना पायउतर करण्यामागे असलेल्यांच्याविरोधात हा असंतोष खदखदत आहे.

पणजी

आम आदमी पक्षात अनेक नेत्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्षल विजय सरदेसाईंसारख्या राज्यव्यापी पोच असलेल्या नेत्यांने राज्य संयोजकपद स्वीकारावे यासाठीही आम आदमी पक्षाकडून प्रयत्न आहेत. मात्र त्यासाठी गोवा फॉरवर्डचे आम आदमी पक्षात विलीनीकरण ही अट घालण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
आम आदमी पक्षाकडून मडगाव विधानसभा मतदारसंघात लढण्यासाठी एक महत्वाकांक्षी नेता तयार आहे. त्या नेत्याने याआधी मडगावातून राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवून पाहिली आहे. आम आदमी पक्षाकडून मागील निवडणुकीवेळी सिद्धार्थ कारापूरकर हे मडगावचे उमेदवार होते. त्यामुळे त्या नेत्याने कारापूरकर यांची भेट घेतली. कारापूरकर यांनी मैत्रीला जागत तो नेता लढणार असेल तर आपण माघार घेतो असे स्पष्ट केले. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या त्या नेत्याने एल्विस गोम्स यांची भेट घेतली. गोम्स यांनी पहिल्याच भेटीत मला गृहित धरू नका. मी आहे म्हणून जर तुम्ही  आम आदमी पक्षात येणार असाल तर तुमच्या जबाबदारीवर निर्णय घ्या असे स्पष्ट केले. यामुळे आम आदमी पक्षातील घडामोडींमुळे त्या नेत्याने थांबा व पहा अशी भूमिका स्वीकारली आहे.
गोवा फॉरवर्डचे दोन आमदार मध्यंतरी भाजपमध्ये जातात की काय असे वातावरण तयार झाले होते. आमदारांनी आपल्या समर्थकांकडे खासगीत बोलताना मोठा राजकीय निर्णय होऊ शकतो अशी कल्पनाही दिली होती. त्यातच साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांचा लोलये दौरा आणि श्री बेताळ देवाचे दर्शन हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आम आदमी पक्षात जाण्याविषयीचा विचार बळावला असल्याची माहिती मिळाली आहे.
आम आदमी पक्षाचे दिल्लीतील नेतृत्व यासाठी प्रयत्न करत आहे. सरदेसाई यांनी संयोजकपद स्वीकारावे त्यांनी पक्षाची राज्याची धुरा ताब्यात घ्यावी. पक्ष चालवण्यासाठी लागणारे बळ सध्या दिल्लीतून पुरवण्याची तयारी व ताकद आहे याविषयी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी गोवा फॉरवर्डचे आम आदमी पक्षात विलीनीकरण अशी अट घातली आहे. विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे असताना ही अट मान्य करणे थोडे कठीण असल्याने सरदेसाई यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेला अपेक्षित अशा वेगाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. मात्र हे सारे करत असताना एकाचवेळी भाजप आणि कॉंग्रेसवर प्रहार करण्याची तयारी आम आदमी पक्षाने सुरु केली आहे.

 

संबंधित बातम्या