म्हादई आमची आई, तिचे संरक्षण करण्यासाठी हवं ते करू- आप

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

म्हादई आमची आई आहे. ती राज्यातील शेती आणि विविधतेसाठी एक प्रमुख स्त्रोत आहे. भाजपने ज्या प्रकारे आमच्या मातेवर अन्याय केला, ते आम्ही सर्वांनी पाहिले. यापुढे या प्रश्नावर आम्ही गप्प राहणार नसल्याचेही आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.      

पणजी- राज्यात आम आदमी पक्षाने म्हादई प्रश्नी कठोर पवित्रा घेतला आहे. म्हादई आमची आई असून आम्ही तिचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करू, असे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राहूल म्हांब्रे यांनी म्हटले आहे.  याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत त्यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उद्धटपणे म्हादई प्रश्नी भाष्य करणे टाळत गोवावासियांची फसवणूक केली आहे. याउलट केंद्रीय मंत्र्यांची ही भेट गोव्याच्या नागरिकांसाठी गोव्याच्या पर्यावरणाबद्दल केंद्राकडून आणि राज्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांबाबत स्पष्टपणे जाणून घेण्याची संधी होती. मात्र, नेहमीप्रमाणे याही वेळेला भाजपने त्यांना गोवावासियांची काळजी नसल्याचे सिद्ध केले. जावडेकर यांनी काळजीपूर्वक या प्रश्नावर बोलणे टाळले. कोणत्याही समस्यांवर त्यांनी भाष्य केले नाही. यावरून ते केवळ सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठीच गोव्यात आले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.        

गोवा, कर्नाटकात तसेच केंद्रातही भाजपचेच सरकार असूनही म्हादई प्रश्नी कोणताही तोडगा न काढता हे पाणी वळवण्यात आले. म्हादई आमची आई आहे. ती राज्यातील शेती आणि विविधतेसाठी एक प्रमुख स्त्रोत आहे. भाजपने ज्या प्रकारे आमच्या मातेवर अन्याय केला, ते आम्ही सर्वांनी पाहिले. यापुढे या प्रश्नावर आम्ही गप्प राहणार नसल्याचेही म्हांब्रे यावेळी म्हणाले.      

राज्याच्या दौऱ्यावर असताना जावडेकरांनी शेतकऱ्यांशी हा काळा कायदा आणण्यापूर्वी चर्चा का केली नाही? शेतकऱ्यांसाठी घेण्य़ात येणारे निर्णय भाजप कार्यालयातच घेतले जातात का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. म्हादईचे पाणी इतरत्र वळवताना आमच्या भविष्यातील पाण्याच्या प्रश्नाबद्दल जावडेकर यांनी काहीही उत्तर दिले नाही. म्हादईच्या पाणाचा प्रवाह वळविल्यामुळे पाण्य़ातील क्षारांचे प्रमाण वाढेल जे पर्यावरणावर आघात करणारे असेल, अशी भीतीही यावेळी म्हांब्रे यांनी व्यक्त केली.           
 

संबंधित बातम्या