‘आप’ हा पक्ष म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज: राहुल म्हांबरे

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

राहुल म्हांबरे : पक्षात सहभागी होणाऱ्यांना राज्याचे राजकारण बदलण्याची संधी

पणजी: ‘आप’ हा एकच असा पक्ष आहे जो सर्वसामान्य गोवेकर जनतेचा आवाज बनलेला आहे. कारण या पक्षानेच गोवेकरांच्या रोजच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आमचे नेते प्रत्येक मुद्यावर अग्रेसर राहिलेले आहेत, असे आम आदमी पक्षाचे सहयोगी निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी आज पत्रकार परिषदेत नमूद केले.

ते म्हणाले, की या पक्षाशी एकमत असलेल्या आणि पक्षाचे हितचिंतक असलेल्या सर्वांना ‘आप’ हा पक्ष आवाहन करीत आहे की त्यांनी पक्षात यावे आणि पक्षाच्या कार्यात सामील व्हावे. ज्याप्रमाणे गोव्यात राजकारण केले जाते, ते बदलण्याची ही एक फार मोठी संधी आहे. गोमंतकीयांनी हे समजून घेतले पाहिजे की सध्याच्या काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांपैकी कुणालाही जर तुम्ही मतदान केले, तरी त्याचा परिणाम हा एकच राहणार आहे. भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांबरोबर संगनमत केलेले असून एकमेकांबरोबर मिसळून एक भ्रष्ट व्यवस्था तयार करून ठेवली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये कोणीही सत्तेत का असेना, ते एकमेकांची काळजी घेतात व एकमेकांना सांभाळून घेतले जाते. या महामारीमध्ये लोक मरत असतानाही केवळ पैसा कमावणेएवढाच त्यांचा एकमेव उद्देश राहिलेला आहे.
  
‘सध्या गोव्यात काय चालले आहे हे तुम्हीच बघा. आर्थिक घोटाळे आणि गैरव्यवहारांची एक मालिकाच, तीही अशा महामारीच्या काळ्या आणि बिकट काळात आपल्याला पाहायला मिळत आहे. गोव्यातील लोकांनी हे सर्व सहन करायची गरज आहे का? आम्ही हे सर्व मुद्दे वर उचललेले आहेत, पण आम्हाला अजून जास्त पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला गोवा एक घोटाळामुक्त राज्य बनवायचे आहे. सर्व निकषांच्या बाबतीत एक प्रथम क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे.’ असे ते 
म्हणाले.

संबंधित बातम्या