मळकर्णेत ‘आराधना’ डिजिटल वाचनालय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

मळकर्णे केपे येथील सरकारी हायस्कुलमध्‍ये आराधना ग्रामीण वाचनालयाच्या माध्यमातून वाचनालयाबरोबर संगणकीय वाचनालय सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांची वेळेची बचत होत आहे. त्‍यामुळे पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कुडचडे: आजचे युग डिजिटल झाल्याने युवा वर्ग मोठ्या प्रमाणात नव्या तंत्रज्ञानाच्‍या दिशेने वळू लागला आहे. ही गरज ओळखून सरकारी हायस्कूल मळकर्णे येथील मुख्याध्यापक सिंधू प्रभुदेसाई यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे यायला हवेत, या विचाराने आराधना ग्रामीण वाचनालयाच्या सहकार्याने डिजिटल वाचनालय सुरू केले.

 

मळकर्णे केपे येथील सरकारी हायस्कुलमध्‍ये आराधना ग्रामीण वाचनालयाच्या माध्यमातून वाचनालयाबरोबर संगणकीय वाचनालय सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांची वेळेची बचत होत आहे. त्‍यामुळे पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बऱ्याच ठिकाणी पूर्वी ग्रामीण वाचनालये असायची त्याचा फायदा दैनंदिन वर्तमानपत्रे व कादंबरी, मासिक, साप्ताहिक वाचण्यासाठी ज्‍येष्‍ठ लोकांकडून केला जात असे. आजच्या घडीला युवकवर्ग वर्तमानपत्रे वाचण्यापेक्षा मोबाईल, संगणकाचा वापर अधिक करीत असल्याने वर्तमानपत्रे वाचणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. हळूहळू ग्रामीण वाचनालये बहुतांश ठिकाणी बंद पडत गेली.

 

गोव्यातील दहा दैनिक वर्तमानपत्रे वाचनालयात उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी सामाजिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्‍याचा सदुपयोग करतात. त्यानंतर आज बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षकवर्ग वेगवेगळ्या विषयांची माहिती संकलन करायला सांगतात. अशावेळी विद्यार्थी आपल्या पालकांना सोबत घेऊन सांगे किंवा कुडचडे शहरात जाऊन डिजिटल सेंटरमध्ये ताटकळत राहून माहिती गोळा करीत असत. यामुळे पालकांचा वेळ वाया जात असे, मुलांना आपला अभ्यासाचा वेळ खर्च करून माहिती गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागत असे. आज विद्यार्थी आपल्याला हवी ती माहिती वाचनालयात बसून गोळा करू शकतो. यात विद्यार्थी स्वतः संगणक वापरू शकतो व हवी ती माहिती विनाखर्च गोळा करू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांत निर्माण करण्यास मुख्याध्यपिका सिंधू प्रभुदेसाई यशस्वी ठरल्‍या.

 

आज ऑनलाईन शिक्षण झाल्याने शिक्षकवर्ग स्वतः जीव ओतून आजही विद्यार्थ्यांना शिकवीत आहे. शिकविलेले मुलांना किती कळाले, याची पडताळणी शिक्षक घेत असतात. एकूणच ग्रामीण भागात असूनही केवळ वाचनालयावर अवलंबून न राहता पुढील गरज काय? याची जाणीवपूर्वक नोंद घेऊन संगणकीय ग्रामीण वाचनालय आज जोमाने सुरू आहे. या कामी आपल्याला श्रीपाद सामंत यांचे खूप सहकार्य लाभत असल्याचे सिंधू प्रभुदेसाई यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या