राज्यात 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेची कार्यवाही २ ऑक्टोबरपासून

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

गरीब कल्याण योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख २२ हजार २७० जणांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला. ७० हजार महिलांना जनधन योजनेंतर्गत मासिक पाचशे रुपयांचा लाभ देण्यात आला.

पणजी: प्रत्येक गाव व शहर स्वावलंबी झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक शहर आणि गावात काय केले पाहिजे, याचा आराखडा तयार केला आहे. २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर बेतलेली स्वयंपूर्ण गोवा या मोहिमेची कार्यवाही राज्यभरात सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे केली.

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत देशाच्या सकल उत्पादनाच्या १० टक्के रक्कम यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध केली. याच धर्तीवर आम्ही स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन, वन, कृषी, पर्यावरण या खात्यांनी या संकल्पनेनुसार काम सुरू केले आहे. इतर खात्यांनीही याचे अनुकरण करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्याचा आराखडा त्या खात्यांनी तयार करावा, असे कळवण्यात आले आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षण १७ खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आजवर दिले आहे. किसान क्रेडिट कार्ड मोहीम गतिमान करण्यात आली आहे. मच्छीमार व दुग्धोत्पादन करणाऱ्यांनाही किसान कार्ड दिले गेले आहे. गरीब कल्याण योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख २२ हजार २७० जणांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला. ७० हजार महिलांना जनधन योजनेंतर्गत मासिक पाचशे रुपयांचा लाभ देण्यात आला. गरीब कल्याण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ९ हजार १०० शेतकऱ्यांना मासिक दोन हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. ११ कोटी रुपये जिल्हा खनिज निधीतून औषधे व इतर साहित्यावर खर्च करण्यात आले आहेत. १ हजार ५९८ जणांना दोन महिन्याचे किराणा साहित्य मोफत पुरवण्यात आले. २७ योजनांचा लाभ आजवर करून दिला आहे.

कर्मयोगी संकल्पनेद्वारे काम अपेक्षित‍
कर्मयोगी या संकल्पनेच्या आधारे कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. २ ऑक्टोबर रोजी पालिका व पंचायती पातळीवर प्रत्यक्षात काम करणे सुरू केले जाणार आहे. बॅंका, वित्तीय संस्थांसोबत आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांसोबत चार चार बैठका घेऊन नव्या संकल्पनांसाठी पतपुरवठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. शेतकरी, फिरते विक्रेते आणि मजूर यांना अर्थव्यवस्थेत स्थान देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या