प्रस्तावीत मरिना प्रकल्पाविषयी पुढील महिन्यात २६ रोजी जनसुनावणी

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी नोव्हेंबरची तारीख जाहीर झाली त्यावेळी ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी किनारा क्षेत्रिय व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) अंतिम होईपर्यंत मरिना प्रकल्पावरील सुनावणी तहकूब करण्याचे आश्‍वासन स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते.

पणजी, 

तिसवाडी तालुक्यातील नावशी येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित मरिना प्रकल्पाविषयीची पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणी येत्या २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियममध्ये याठिकाणी घेण्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केले आहे.
न्हावशी येथील हा प्रकल्प मुंबईची कारगवाल कन्स्ट्रक्शन कंपनीने मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मदतीने मरिना प्रकल्प उभारण्यात येणार आहे. परंतु गेल्यावर्षी या प्रकल्पाला बिगरसरकारी सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिकांचा विरोध दर्शविला आहे. याशिवाय या प्रकल्पाच्याविरोधात अनेक पंचायतींनीही आंदोलन केले होते. तसेच स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी आपण नागरिकांबरोबर राहणार असल्याची भूमिका मांडली होती. या प्रकल्पाविषयी गेल्यावर्षी २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात दि. २ रोजी पर्यावरणीय जनसुनावणी ठेवली होती.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी नोव्हेंबरची तारीख जाहीर झाली त्यावेळी ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी किनारा क्षेत्रिय व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) अंतिम होईपर्यंत मरिना प्रकल्पावरील सुनावणी तहकूब करण्याचे आश्‍वासन स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते.
पुढील महिन्यात ता. २६ रोजी सकाळी होणारी ही पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होणार आहे. जिल्हाधिकारी, पर्यावरण व वन खात्याचे अधिकारी, उद्योग-व्यापार व वाणिज्य संचालनालयाचे संचालक, तिसवाडी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, उत्तर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तिसवाडी तालुक्यातील आगशी, भाटी, कुडका-बांबोळी, गोवा वेल्हा, मेरशी, सांताक्रुझ, शिरदोण-पाली, ताळगाव, मुरगाव तालुक्यातील चिखली, सांकवाळ, कुठ्‍ठाळी, केळशी, वेळसाव-पाले या पंचायतीचे सचिव आणि सरपंच, तर पणजीतील सरस्वती मंदीर ग्रंथालय, महालक्ष्मी प्रासादिक मंडळ, सेंट्रल लायब्ररी (पाटो) आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे पर्यावरणीय परिणाम मुल्यांकन अहवाल तसेच अर्ज याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या